‘थर्टी फर्स्ट’लाच नवा महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

धुळे - येथील महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ५० जागा जिंकत महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपचा महापौर, उपमहापौर कोण होणार, याची उत्सुकता अद्यापही चर्चा आणि तर्क-वितर्कांवरच कायम आहे. दरम्यान, आता विभागीय आयुक्तांनी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी ३१ डिसेंबरला विशेष सभा बोलावण्याबाबत महापालिकेला पत्र दिले आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच धुळेकरांना नवीन महापौर, उपमहापौर लाभणार आहेत. 

धुळे - येथील महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ५० जागा जिंकत महापालिकेची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपचा महापौर, उपमहापौर कोण होणार, याची उत्सुकता अद्यापही चर्चा आणि तर्क-वितर्कांवरच कायम आहे. दरम्यान, आता विभागीय आयुक्तांनी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी ३१ डिसेंबरला विशेष सभा बोलावण्याबाबत महापालिकेला पत्र दिले आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच धुळेकरांना नवीन महापौर, उपमहापौर लाभणार आहेत. 

येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी नऊ डिसेंबरला मतदान झाले, तर १० डिसेंबरला निकाल लागला. १९ प्रभागांतील ७४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने तब्बल ५० जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता खालसा केली. या निर्विवाद सत्ता संपादनानंतर भाजपचा महापौर कोण होणार, याची शहरातच नव्हे, तर जिल्हाभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. काही नवीन चेहऱ्यांसह अनुभवी चेहरेही या पदाच्या ‘रेस’मध्ये असल्याची चर्चा सध्या रंगते आहे. भाजपकडून मात्र अधिकृतपणे अद्याप कुणाचेही नाव समोर आलेले नाही. त्यामुळे उत्सुकता आणि त्यानिमित्ताने नावांबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेतच भाजपने मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी करून महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी वालीबेन मंडोरे व प्रतोदपदी युवराज पाटील यांची निवड केली. 

विशेष सभेसाठी पत्र प्राप्त
विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी आज महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी ३१ डिसेंबरला सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्याबाबत महापालिकेला पत्र दिले. विद्यमान महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ ३० डिसेंबरला संपुष्टात येत असल्याने नवीन महापौर, उपमहापौर निवडीसाठी ३१ डिसेंबरला सभा होईल. या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या धामधुमीतच शहराला नवीन महापौर, उपमहापौर लाभणार आहेत. ज्यांच्या गळ्यात माळा पडतील त्यांच्यासह समर्थकांचा ‘थर्टी फर्स्ट’ आणि नवीन वर्षाचा हा आनंद द्विगुणित होणार आहे.

विरोधकांच्या गटाकडे लक्ष
७४ पैकी ५० जागा भाजपने जिंकल्यामुळे विरोधकांची ताकद कमी झाली आहे. सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने भाजपने गटनोंदणी केल्यानंतर आता विरोधकांच्या गटनोंदणीकडे लक्ष लागले आहे. एकत्र निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित गटनोंदणी करतील व स्वीकृत नगरसेवकपदाच्या एका जागेसाठी दावा करतील, अशी शक्‍यता आहे. उर्वरित एक-दोन जागा जिंकणारे पक्ष अद्याप विखुरलेलेच आहेत.

Web Title: new mayor of Thirty First