होळीसाठी गावी परतणार्‍या नवदाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

ताहाराबादकडून सटाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या भारत गॅस कंपनीच्या टँकर (क्रमांक एम.एच. ४३ वाय. ३०५५) ने त्यांच्या दुचाकीस समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या धडकेत दुचाकीसह बागूल पती-पत्नी टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

सटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचुर – प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावर आज बुधवार (ता.२०) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणार्‍या गॅस टँकरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले असून त्याचा चेंदामेंदा झाला. अपघातास कारणीभूत असलेला चालक टँकर सोडून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सटाणा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी : संतोष बापू बागूल (वय २२ रा. आलियाबाद ता. बागलाण) यांचा विवाह गेल्या वर्षभरापूर्वी सपना बागूल (वय २१) हिच्याशी झाला होता. लग्नानंतर संतोष बागूल सध्या नाशिक येथील खासगी रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. आज होळीचा सण असल्याने आपल्या मूळ गावी जाऊन इतर कुटुंबीयांसोबत आनंदात हा सण साजरा करण्यासाठी संतोष बागूल यांनी आज दुपारनंतर रजा टाकली. दुपारी ते पत्नीला घेऊन नुकत्याच नव्याने घेतलेल्या पल्सर (अजून क्रमांक मिळालेला नाही) या दुचाकीने गावी आलियाबादला येण्यासाठी निघाले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सटाणा शहर सोडल्यावर विंचुर – प्रकाशा राज्य महामार्गाने ताहाराबादच्या दिशेने जात असताना शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्वीच्या डांग्या हनुमान मंदीरासमोर

ताहाराबादकडून सटाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या भारत गॅस कंपनीच्या टँकर (क्रमांक एम.एच. ४३ वाय. ३०५५) ने त्यांच्या दुचाकीस समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या धडकेत दुचाकीसह बागूल पती-पत्नी टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघात घडताच टँकरचालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला सोडून पळ काढला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. माहिती समजताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा करीत आहेत. 

दरम्यान, बागूल नवदाम्पत्याच्या अपघाती मृत्यूमुळे बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात असलेल्या आलियाबाद या गावावर ऐन होळीच्या दिवशी शोककळा पसरली आहे. 

Web Title: newly married couple dead in accident near Nashik