निजामपूरला सरपंचपदासाठी मुस्लिम सदस्यांमध्ये 'कांटे की टक्कर.!'

nijampur
nijampur

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर(ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीची सरपंच निवड सोमवारी (ता.8) बोलाविण्यात आलेल्या सदस्यांच्या विशेष सभेत होणार असून निजामपूर भागाचे मंडळाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.चित्ते बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. ग्रामविकास अधिकारी पी.बी.मोराणे, तलाठी प्रशांत माळी, युनूस सय्यद, भूषण रोजेकर, सुनील साळुंखे आदी सहकार्य करतील.

मुस्लिम सदस्यांमध्ये 'कांटे की टक्कर!'
एका वर्षासाठी सरपंचपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे ठरले आहे. आपापसात एकमत न झाल्याने सलीम पठाण व जाकीर तांबोळी या दोन्ही सदस्यांमध्ये 'कांटे की टक्कर' होणार आहे. याबाबत कोअरकमिटी हस्तक्षेप करणार नसल्याचे समजते. सलीम पठाण यांना काँग्रेसचे, तर जाकीर तांबोळी यांना क्वालिटी ग्रुपचे समर्थन असल्याची चर्चा आहे. कोअर कमिटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य नेमके कुणाच्या पाठीशी उभे राहतात याबाबत उत्सुकता आहे.

सामाजिक प्रतिनिधित्व...
ग्रामपंचायतीत सामाजिकदृष्ट्या पाच वाणी, एक गुजराथी, तीन मुस्लिम, तीन भिल, दोन भोई, एक कुंभार, एक मातंग, एक मराठा असे एकूण सतरा सदस्य आहेत. वाणी-गुजराथी समाजाला यापूर्वीच सरपंचपदाची संधी मिळाली असून आता मुस्लिम समाजाची दावेदारी आहे. साधना राणे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवड होत आहे. सकाळी 10 ते 12 नामांकन दाखल करण्याची व दुपारी 12 ते 2 माघारीची मुदत असून दुपारी दोनला प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सुरु होईल. आगामी सरपंचपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

सदस्यांची जमवाजमव सुरू...
ग्रामपंचायतीत अजितचंद्र शाह, रजनी वाणी, साधना राणे, रवींद्र वाणी, प्रवीण वाणी, परेश वाणी, सलीम पठाण, दिलनूरबी सय्यद, जाकीर तांबोळी, सुनील बागले, इंदूबाई भिल, कासुबाई भिल, अनिता मोहने, सुनंदा बेंद्रे, मालुबाई शिरसाठ, कमलबाई मोरे, दीपक देवरे आदी सतरा सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्याची चर्चा असून नववा सदस्य नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहतो? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. सतरापैकी काही सदस्य 'नॉट रीचेबल' असल्याचे समजते.

कोअरकमिटीच्या भूमिकेकडेही लक्ष...
कोअर कमिटीत ज्येष्ठ नेते ऍड.शरदचंद्र शाह, बाळूशेठ विसपुते, अरुण वाणी, दत्तात्रय वाणी, डॉ.रमाकांत शिरोडे, वासुदेव बदामे, चंदूलाल जाधव, लियाकत सय्यद आदींचा समावेश आहे. यापूर्वी सरपंच निवडीवरून कोअरकमिटी सदस्यांमध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे ह्यावेळी कोअरमिटीच्या भूमिकेकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

"कोअरकमिटीने कोणत्याही सदस्याचे नाव सुचविलेले नसून 'मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व' असे म्हटले आहे. जर मुस्लिम सदस्यांमध्ये एकमत होत नसेल तर त्यांनी बहुमत सिद्ध करावे. कोअरकमिटी त्यात हस्तक्षेप करणार नाही."
- अॅड.शरदचंद्र शाह, ज्येष्ठ नेते व कोअरकमिटी सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com