धनादेशासह बनावट सही शिक्के वापरून बँकेतून 9 लाख केले हडप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

  • येवल्यातील सुरेगाव रस्ता ग्रामपंचायतीच्या ग्रामीण बँकेच्या खात्यात माजी सरपंचांचा प्रताप 
  • बँकांच्या कामकाजाचा सावळागोंधळ पुढे
  • शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून चौकशी सुरू

येवला : सुरेगाव रस्ता येथील ग्रामपंचायतीच्या येवल्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शासकीय योजनेच्या खात्यातून बनावट धनादेश, सरपंच व ग्रामसेवकांचे बनावट सही शिक्के वापरून अज्ञात व्यक्तींनी तब्बल 9 लाख 39 हजार रुपये लंपास केले आहे. विशेष म्हणजे हे पैसे बँकेतीलच दुसऱ्या खात्यावर धनादेशाद्वारे वर्ग करण्यात आले असून या प्रकारामुळे बँकांच्या कामकाजाचा सावळागोंधळ पुढे आला आहे. याबाबत आज ग्रामसेविका नीलिमा बोरसे यांच्या तक्रारीनुसार व गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.

मूलभूत सुविधा योजने अंतर्गत गावापासून देवठाण व उक्कडगाव पर्यंतच्या दोन रस्त्यांचे कामे 2017 मध्ये ठेकेदाराने पूर्ण केले. त्यानंतर ग्रामपंचायतींकडे ठेकेदाराने बिलाची सातत्याने मागणी केली होती. परंतु विविध कारणांमुळे ग्रामपंचायत बिल देण्यास टाळाटाळ करीत होती. या सगळ्या वादात ग्रामपंचायत प्रशासनाने नंतर ठेकेदार गोविंद गायके या ठेकेदाराच्या नावाने 2 लाख 45 हजार रुपयांच्या बिलाचा धनादेश दिला. मात्र धनादेश बँकेत घेऊन गेल्यावर खात्यावर पुरेसे पैसे नसल्याचे बँकेतून त्यांना सांगण्यात आले, त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी ग्रामसेविका नीलिमा बोरसे यांनी येवल्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चौकशी केली असता ग्रामपंचायतीने अधिकृतरीत्या घेतलेल्या धनादेश पुस्तकातील हे धनादेश नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे त्या धनादेशावर सरपंच व ग्रामसेवकांचे सही शिक्के देखील बनावट असल्याचे बोरसे यांनी बँकेच्या निदर्शनास आणून दिले. चौकशी केली असता हे सर्व धनादेश माजी सरपंच प्रकाश गायके यांनी स्वतः अर्ज करून बँकेकडून मिळवले असल्याचेही उघडकीस आले आहे. ग्रामपंचायतीने धनादेश मागितले नसताना बँकेने हे धनादेश दिलेच कसे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

19 जानेवारी 2019 च्या दरम्यान वेगवेगळ्या तारखांना 5 धनादेशाद्वारे 9 लाख 39 हजाराची ही रक्कम काढली गेली असून ही रक्कम याच बँकेतील देवनाथ माधव गायके यांच्या खात्यावर जमा झाल्याचे लक्षात आले आहे. बँकेकडे अगोदरच धनादेश शिल्लक असताना व ग्रामसेविकेने मागणी केलेली नसताना बँक अधिकाऱ्याने धनादेश कसे दिले? असा सवाल करण्यात येत असून या खात्यावर बँकेमध्ये लिंक केलेला मोबाईल नंबर देखील बोरसे यांचा नसुन पूर्वीच्या ग्रामसेवकाचा नंबर येथे लिंक आहे. आम्ही बँकेला नंबर बदलासाठी पत्र देऊनही बँकेने माझा नंबर या खात्याला लिंक केला नसल्याचे त्यांनी जवाबात म्हटले आहे.

विशेष म्हणजे देवनाथ गायके यांच्या ग्रामीण बँकेतील खात्यातून 28 जानेवारीला 3 लाख 95 हजाराची रक्कम प्रकाश गायके यांच्या अंदरसूल येथील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेवर आरटीजीएस केल्याचेही आढळून आले आहे. या प्रकरणी आज गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर ग्रामसेविकेने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी सर्वांचे जबाब नोंदविले आहे. या शासकीय विकास निधीचा अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी येथील पोलिसांनी हे प्रकरण आता वरिष्ठांकडे पाठविले असून त्यांच्या परवानगीनंतर हा गुन्हा दाखल होणार आहे. गायकेसह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचे बोरसे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान गावोगावी मनरेगाच्या निधीवर अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी मजुरांचे एटीएम वापरून डल्ला मारत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच झाल्या आहे. आता तर थेट रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामपंचायतीमध्ये नेमके चाललंय काय? असा सवाल केला जाऊ लागला आहे.

“ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातील रक्कम बनावट पद्धतीने परस्पर काढण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. या गंभीर घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन पोलिस प्रशासनाकडून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.” 
- वंदना डमाळे, सरपंच, सुरेगाव रास्ता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine lakh looted from the bank using fake stamps with check at yeola