निजामपूर-जैताणेत अतिक्रमणांचा विळखा...

भगवान जगदाळे
बुधवार, 16 मे 2018

"बसस्थानक व महामार्गलगतच्या अतिक्रमणांशी ग्रामपंचायतीचा काहीएक संबंध नसून त्या समस्येचे निराकरण करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. आम्ही गावात यापूर्वी वॉर्ड क्रमांक चारमधील एका गल्लीत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली होती."
- संजय खैरनार, सरपंच, जैताणे ता. साक्री, धुळे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता.साक्री) या दोन्ही बाजारपेठेच्या गावांना सद्या अतिक्रमणांनी मोठ्या प्रमाणावर विळखा घातला असून, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचाही अतिक्रमण धारकांवर वचक राहिला नसल्याने कोणीच कोणाचे ऐकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः जैताणेत तर अतिक्रमणधारकांनी कहरच केला आहे.

"ज्याला जेथे पटेल तेथे अतिक्रमण..."
गावठाणच्या जागांवर ज्याला जेथे पटेल तेथे अतिक्रमण सुरू आहे. 'बळी तो कान पिळी' या उक्तीप्रमाणे साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरून अतिक्रमण केले जाते. काही महाभागांनी तर अक्षरशः गावठाणच्या सरकारी व सार्वजनिक जागा बळकावून त्या ठिकाणी स्वतःचे खाजगी साम्राज्य उभारले आहे. तर काहींनी फुकटच्या जागा बळकावून त्या जागांची लाखो रुपयांना विक्री देखील केली आहे. मतांच्या राजकारणासाठी पुढारी देखील त्यांना बोलायला धजत नाही. अतिक्रमण धारकांच्या दहशतीपोटीही सामान्य माणूस आवाज उठवत नाही. जो आवाज उठवतो त्याचा पद्धतशीरपणे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो.

"गल्ल्यांचे रूपांतर बोळीत..."
पूर्वी गावातील ज्या गल्ल्यांमधून एकाच वेळी दोन अवजड वाहने निघून जाऊ शकत होते. त्या गल्ल्यांमधून अक्षरशः एक वाहन पास होणे सुद्धा अवघड झाले आहे. अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधीही शिस्त लावण्याऐवजी 'चिरीमिरी' घेऊन अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. नवीन बांधकामे करतांना, नळकनेक्शन घेताना बहुतेक जण ग्रामपंचायतीची परवानगी घेत नाहीत.

जैताणेत तर अतिक्रमणांची स्पर्धाच...
सद्या जैताणेत जणू काही अतिक्रमणांची स्पर्धाच सुरू आहे. गल्लीत बांधकामे करतानाही प्रत्येक जण शेजाऱ्यापेक्षा दोन-चार फूट पुढे सरकूनच बांधकामे करतो. त्यामुळे पार्किंगचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. जैताणेत शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने कापूस, कांदे आदी मालाची ने-आण करणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रक आदी मालवाहतूक करणारी वाहने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे अनेकदा गावकऱ्यांमध्ये वाद देखील होतात.

"लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या अतिक्रमणांची चौकशी करा : ग्रामस्थांची मागणी..."
आधी आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या अतिक्रमणांची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे. सत्तेचा गैरवापर करून यापूर्वी व आजपर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी गावात व महामार्गलगत बेकायदेशीर अतिक्रमणे केली असतील त्यांच्या अतिक्रमणांची आधी चौकशी झाली पाहिजे. अशी सामान्यांची अपेक्षा आहे. केवळ स्वतःच्या गल्लीपुरते काँक्रीटीकरण अथवा पेव्हर ब्लॉक, गल्लीपुरती सिमेंटची गटार, गल्लीपुरते चोवीस तासाचे नळकनेक्शन व एक सार्वजनिक दिवा बसवला म्हणजे झाली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण. अशी लोकप्रतिनिधींची धारणा आहे.

"जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणांकडे लक्ष घालण्याची गरज..."
निजामपूर-जैताणेतील मुख्य रस्ते, मुख्य गल्ल्या, मुख्य चौक व गावठाण गट क्रमांक ९२ मधील बेकायदेशीर अतिक्रमणांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालण्याची गरज असून चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविणेही गरजेचे आहे. अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींचे व अधिकाऱ्यांचे अतिक्रमणधारकांशी 'अर्थपूर्ण' संबंध असल्याने, भीतीपोटी व मतांच्या राजकारणासाठी ते याकडे दुर्लक्ष करतात.

Web Title: nizampur jaitane encroachment