
वीसहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या माध्यमातून रोज चार ते पाच हजार रुग्णांवर उपचार केला जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु रुग्ण संख्येचा आकडा बघता त्यावर विश्वास बसणार नाही. त्याला कारण म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावातून समोर आले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला व महिलांवरील उपचार एवढ्यापुरतेच काम मर्यादित राहिले आहे
नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांत सर्व आजारांवर उपचार होतात हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. कारण महापालिकेच्या रुग्णालयात सर्दी, खोकला या किरकोळ आजारांवरच उपचार होत असल्याची बाब समोर आली आहे. मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञच नसल्याने महापालिकेची रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रे झाली असून, याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल 52 पदे रिक्त असल्याचे कारण दिले जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या व्याख्येत बसणारे डॉक्टर रुग्णालयांत सेवा देण्यास तयार नसल्याची कबुली महापालिकेकडून देण्यात आली आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा..५२ पदे रिक्त
वीस लाख लोकसंख्या असलेल्या नाशिक शहराचा समावेश टू टायर सिटीमध्ये होतो. महापालिकेला "ब' वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सेवादेखील लोकसंख्या व दर्जाप्रमाणे असायला हव्यात. पायाभूत सुविधा त्याप्रमाणात असल्या तरी सेवा मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या आहेत. शहरात डॉ. झाकिर हुसेन, जे.डी. सी. बिटको, मोरवाडी, पंचवटीतील इंदिरा गांधी ही मोठी रुग्णालये आहेत. त्याव्यतिरिक्त वीसहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या माध्यमातून रोज चार ते पाच हजार रुग्णांवर उपचार केला जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु रुग्ण संख्येचा आकडा बघता त्यावर विश्वास बसणार नाही. त्याला कारण म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय विभागाच्या प्रस्तावातून समोर आले आहे. त्यामुळे सर्दी, खोकला व महिलांवरील उपचार एवढ्यापुरतेच काम मर्यादित राहिले आहे.
हेही वाचा > गंगापूर धरणावरील त्या बोटीच्या शोध लागणार?
मोठ्या आजारांसाठी खासगी रुग्णालये
उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, विषबाधा, सर्पदंश, हृदययरोग, किडनीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असताना या आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत. आस्थापनेवर 105 पदे मंजूर आहेत. त्यातील तब्बल 52 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांपैकी 27 पदे मानधनावर भरली असली तरी रुग्णालयाचे कायम वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात व मानधनावरील डॉक्टरांमध्ये वाद आहे. मानधनावरील डॉक्टरांना उपचाराऐवजी अन्य कामे दिली जात असल्याची तक्रार मानधनावरील डॉक्टरांची आहे. त्यामुळे त्या डॉक्टरांचे काम मानधन घेण्यापुरतेच मर्यादित झाले आहे. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना नाइलाजाने खासगी मोठ्या रुग्णालयांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे.
हेही वाचा > पत्नीच्या निधनानंतर बाप पोटच्या मुलीसोबतच..