व्यवसायवृद्धीसाठी बिनव्याजी कर्ज

विनोद सूर्यवंशी
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

नवापूर - तळागळातील समाजबांधवांना व्यवसायवृद्धीसाठी जमेल तेवढी मदत केल्यास नक्की समाजाची आर्थिक प्रगती उंचावल्याशिवाय राहणार नाही. मात्र, त्यासाठी समाजातील नेतृत्व सक्षम आणि भविष्याचा विचार करणारे पाहिजे, याच उद्देशाने नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्थेमार्फत जिल्ह्यातील नाभिक व्यवसाय करणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या समाज बांधवांना बिनव्याजी कर्ज वाटप करण्यात येणार आहे. 

नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्थेमार्फत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. गरजूंनी संस्थेकडे अर्ज करून संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. समाजातील होतकरू, गरजूंसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय आहे. यामुळे व्यवसायासाठी काही अडचणींमुळे बॅंकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येणाऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. 

जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्थेमार्फत व्यवसायासाठी दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानाची दुरुस्ती, खुर्ची खरेदी, आरसा खरेदी अशा अनेक कारणांस्तव हे कर्ज देणार आहोत.

कर्मचारी संस्थेकडे जमा असलेल्या रकमेतून ही मदत देण्यात येईल. त्यासाठी नाभिक कर्मचारी संस्थेच्या दोन सभासदांचा जामीन आणावा लागेल. कर्ज घेतलेली रक्कम दहा समान हप्त्यांत जमा करावी लागेल. जिल्ह्यातील ज्या नाभिक व्यावसायिकांना कर्जाची गरज आहे, त्यांनी अर्ज नाभिक कर्मचारी संस्थेत सादर करावेत.

नंदुरबार जिल्ह्यातील नाभिक समाजाचे पन्नासवर कर्मचारी असून, दरमहा पन्नास रुपये आणि शंभर रुपये सभासद शुल्क घेतो. आजीवन सदस्यांकडून पंधरा हजार शुल्क घेतो. या रकमेतून सामाजिक उपक्रमांबरोबरच समाजातील गरजूंना व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाते. काही रक्कम राहत होती, त्यातूनच बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- पंकज भदाणे, जिल्हाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा नाभिक समाज कर्मचारी संस्था.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non Interest Loan for Business Growth