घेरावानंतर तीन संशयितांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

शिरपूर - टेंभे (ता. शिरपूर) येथील आदिवासी महिला व तिच्या मुलीला झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने काल शिरपूर पोलिस ठाण्याला घेराव घातला.  टेंभे येथील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जमावाच्या प्रक्षुब्ध प्रतिक्रियांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. ते नंतर निवळले. 

शिरपूर - टेंभे (ता. शिरपूर) येथील आदिवासी महिला व तिच्या मुलीला झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने काल शिरपूर पोलिस ठाण्याला घेराव घातला.  टेंभे येथील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जमावाच्या प्रक्षुब्ध प्रतिक्रियांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. ते नंतर निवळले. 

टेंभे येथे एक ऑक्‍टोबरला मारहाणीची घटना घडली. तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनी परतवून लावल्याचे आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे. काल दुपारी येथील गुजराथी कॉम्प्लेक्‍सजवळ आदिवासी युवकांचा मोठा जमाव एकत्र झाला. त्यात महिलेचे माहेर असलेल्या शहादा तालुक्‍यासह नंदुरबार जिल्ह्यातील युवकांचा अधिक भरणा होता. आक्रमक घोषणा देत मेन रोडने हा जमाव शहर पोलिस ठाण्यावर चालून गेला. पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. त्यामुळे जमावाने पोलिस ठाण्यास घेराव घातला. 

वातावरणात तणाव 
आंदोलकांतर्फे नंदुरबार येथील मालती वळवी व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र सोनवणे व निरीक्षक संजय सानफ यांच्याशी चर्चा केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर जमाव पांगला. मात्र, रात्री उशिरापर्यंत काही जण पोलिस ठाण्याच्या आवारात थांबून होते. जमावातील काहींनी पोलिसांच्या भूमिकेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वातावरणात तणाव पसरला. मात्र, पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालत शांत केले. 

तिघांविरुद्ध गुन्हा 
या प्रकरणातील पीडित महिला विधवा असून मुलगी व मुलासह टेंभे येथे मोलमजुरी करते. एक ऑक्‍टोबरला लहान मुलांच्या भांडणातून झालेला वाद सोडवण्यासाठी जात असताना तिला संशयित रामसिंह उमेदसिंह राजपूतने जातिवाचक शिवीगाळ केली. तिला मारहाण करून विनयभंग केला. तिला सोडवण्यासाठी अल्पवयीन युवती गेली असता निलेश रामसिंह राजपूत आणि लालसिंह विठ्ठलसिंह राजपूत यांनी तिचा हात धरून अश्‍लील शिवीगाळ करीत विनयभंग केला. अत्याचार करण्याची धमकी देत पीडित महिलेच्या बहिणीलाही मारहाण करण्यात आली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी संशयित रामसिंह राजपूत, निलेश राजपूत व लालसिंह राजपूत यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ व विनयभंगाच्या संशयावरून गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक रवींद्र सोनवणे तपास करीत आहेत. 

Web Title: north maharashtra news crime