जर्मन, ब्रिटिश पर्यटकांचा ‘झिंगाट’वर ठेका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

येवला - रस्ते निर्मनुष्य, गच्च्या फुल्ल अन्‌ आकाश सप्तरंगी... जोडीला ‘वका...ऽरेऽऽ, कटी रेऽऽकटी...’च्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आसमंत आणि नूर फुलविणारी घरगुती डीजेची साद... असे बेधुंद वातावरण रविवारी (ता. १४) मकरसंक्रांतीच्या निमित्ताने उत्सवप्रिय पैठणीनगरीत गल्लोगल्ली होते. अफाट उत्साहात येवलेकर अन्‌ त्यांचे राज्यभरातील पाहुणे पतंगोत्सवात दंग असताना थेट जर्मनी, लंडनच्या विदेशी पर्यटकांसह दार्जिलिंगच्या पतंगप्रेमींनीही या उत्सवाचा आनंद लुटला. पतंगाला ढील देत त्यांनी ‘सैराट’वर ठेका धरत पतंगोत्सवाचा आनंद लुटला.

येवला - रस्ते निर्मनुष्य, गच्च्या फुल्ल अन्‌ आकाश सप्तरंगी... जोडीला ‘वका...ऽरेऽऽ, कटी रेऽऽकटी...’च्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आसमंत आणि नूर फुलविणारी घरगुती डीजेची साद... असे बेधुंद वातावरण रविवारी (ता. १४) मकरसंक्रांतीच्या निमित्ताने उत्सवप्रिय पैठणीनगरीत गल्लोगल्ली होते. अफाट उत्साहात येवलेकर अन्‌ त्यांचे राज्यभरातील पाहुणे पतंगोत्सवात दंग असताना थेट जर्मनी, लंडनच्या विदेशी पर्यटकांसह दार्जिलिंगच्या पतंगप्रेमींनीही या उत्सवाचा आनंद लुटला. पतंगाला ढील देत त्यांनी ‘सैराट’वर ठेका धरत पतंगोत्सवाचा आनंद लुटला.

येवल्याच्या पतंगोत्सवाला दोनशेवर वर्षांची परंपरा असून, अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवला या तीन शहरांतच पतंगोत्सवाची धूम असते. म्हणूनच सुरतचे भावंडं म्हणूनच या गावाची ओळख आहे. मकरसंक्रांतीसह भोगी व कर हे तीन दिवस जणू मंतरलेलेच असतात. या तिन्ही दिवशी रस्ते निर्मनुष्य...कामाला सुटी...तहानभूक विसरून घरांच्या गच्च्या फुल्ल अन्‌ आकाश सप्तरंगी पतंगांनी गजबजून गेलेले असते. रविवारी (ता. १४) सकाळी ढगाळ वातावरण व हवा कमी असल्याने थोड्या उशिराने या उत्साहात अधिक रंग भरला. येवल्याची प्रसिद्ध हलकडी, ढोल-ताशांच्या गजरात अनेक ठिकाणी पतंगप्रेमी पतंग उडविण्यात मग्न दिसले. मात्र, यापेक्षा प्रत्येक गच्चीवर चित्रपटांची गीते मोठमोठी साउंड सिस्टिम लावून पतंगाचा आनंद आबालवृद्धांनी घेतला. चौकाचौकांत पतंग स्टॉल, आसारी व मांजा आदी विक्रेत्यांच्या दुकानांवर खरेदीसाठी गर्दी उसळली होती.  सकाळी सहाला सुरू झालेला हा आनंददायी खेळ सायंकाळी सातपर्यंत सुरू होता. पतंगोत्सवात मग्न असल्याने जणू संचारबंदीसारखे वातावरण शहरात होते. आकाशात दिवसभर वारे काहीसे शांत असतानाही रंगीबेरंगी पतंगांनी आकाशच जणू व्यापले होते. डोळ्यांनी रंगीबेरंगी आकर्षक गॉगल, मांजापासून सुरक्षेसाठी हातात घातलेले मोजे, डोक्‍यावर वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट्‌स, कॅप, आकर्षक कपडे घालून येवलेकरांनी गच्चीवर गर्दी केली होती.

दार्जिलिंगच्या पर्यटकांची पतंगवारी
पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी अर्ध्याहून अधिक येवलेकरांकडे राज्यभरातून पाहुणे येतात. रविवारी (ता. १४) थेट परदेशातून आलेल्या युवकांनी मित्रासोबत पतंग उडविण्याचा आनंद लुटला. जर्मनीतील फ्रॅंकफर्टहून आलेला फेडोरोव्ह, तर लंडनच्या भर्जने गोल्डमन याने पंकज पारख यांच्या शोरूमच्या गच्चीवर सिद्धार्थ पारख व युवा उद्योजक सम्राट वर्मा यांच्यासोबत पतंगोत्सवाचा आनंद लुटला. पतंग उडवतानाच जोरदार वाजणाऱ्या गीतांवर अन्‌ विशेषतः ‘सैराट’मधील गाण्यावर या पर्यटकांनी ठेका धरला. दार्जिलिंग येथील पर्यटकांनीही ताजपार्क कॉलनीतील लालाजी गोतीस यांच्या घरावर पतंग उडवत गगनभरारी घेतली. पतंगोत्सवाला सोमवारी (ता. १५) खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, कल्याणराव पाटील हजेरी लावणार आहेत. रविवारी माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार, माजी संचालक किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, ‘गोल्डमॅन’ पंकज पारख, नगरसेवक प्रवीण बनकर, डॉ. संकेत शिंदे, भाजपचे प्रांतिक सदस्य बाबासाहेब डमाळे आदींनी पतंगोत्सवाचा आनंद घेतला.

वक्काट वक्काटची धूम
पतंग उडविण्यासाठी घरावर गर्दी होती आणि पतंगाला गगनभरारी देताना ‘ढील दे.. ढील दे...’च्या जल्लोषात काटाकाटीचा खेळदेखील जोरदारपणे रंगला. आपल्या मांजाने स्पर्धकाचा पतंग कापला की पतंगप्रेमी ‘वका...ऽरेऽऽ, कटी रेऽऽकटी...वक्काट वक्काट’च्या आवाजाने आसमंत निनादत होता. पतंग कटल्यानंतर पतंगप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता.

Web Title: north maharashtra news kite festival