नदीकाठच्या नागरिकांना महापालिकेकडून नोटिसा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

जुने नाशिक - पावसाळ्यात नदीकाठाच्या नागरिकांचे होणारे नुकसान व त्यांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेता महापालिका प्रशासनातर्फे अशा नागरिकांना नोटिसा बजावून त्यांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पूर्व विभागातील नदीकाठी येणाऱ्या झोपडपट्टी भागातील 116 कुटुंबीयांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

या वर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली असून, ड्रेनेज, नालेसफाईसह विविध कामे सुरू केली आहेत. नदीकाठच्या घरांचे कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण केले जात आहे. पूर्व विभागाच्या विविध भागांतील 116 झोपडपट्टी भागातील नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. नगररचना, बांधकाम विभागातर्फे धोकादायक घरे, वाड्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. दोन ते तीन दिवसांत त्यांनाही नोटिसा बजवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नोटिसा बजावलेले परिसर 
- बलसारा झोपडपट्टी 28 
- आंबेडकरवाडी 10 
- टाकळी आदिवासीवाडी 50 
- शिवाजीवाडी 28 
- एकूण 116 

पश्‍चिम विभागाची लागणार परीक्षा 
पावसाळ्यात सर्वाधिक धोकादायक ठरणारा भाग म्हणजे काझीची गढी. बरेच वर्षे हा भाग पूर्व विभागात येत होता. त्यामुळे येथील नागरिकांना नोटीस बजावणे, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम तेच करीत होते. परंतु, या वर्षी महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या प्रभागरचनेत काझीची गढी परिसराचा पश्‍चिम विभागात समावेश झाला आहे. पश्‍चिम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी परिसर नवीन असल्याने त्यांना सर्वेक्षण करण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत. दोन दिवसांत कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाचे काम सुरू करून तेथील नागरिकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. धोकादायक इमारती, वाडे यांनाही पाऊस सुरू होण्यापूर्वी नोटीस बजावून धोकादायक भाग उतरविण्याचे सांगण्यात येणार आहे. 

Web Title: Notice from Municipal Corporation to the residents of the river