तलवारीने केक कापणे पडले महागात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नाशिक : देवळाली गावातील म्हसोबा मंदिरासमोरील कापड दुकानासमोर एकाने वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापला. त्यानंतर मोठमोठ्याने गाणी म्हणून परिसरात आरडा ओरडा केल्याने हे प्रकरण पोलिसांत गेले. या प्रकरणी 11 संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली आहे. 

इंद्रजित दशरथ विश्‍वकर्मा (24, रा. हांडोरे मळा, वडनेरगेट, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिकरोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली गावात असलेल्या म्हसोबा मंदिरासमोर एक कापड दुकान आहे. मंगळवारी (ता.17) रात्री पावणेनऊ-नऊ वाजेच्या सुमारास दहा-अकरा जण जमले. त्यांच्यातील एकाचा वाढदिवस असल्याने त्यांनी केक आणला होता. यावेळी दुचाकीच्या (एमएच 15 इसी 8310) सीटवर केक ठेवून एकाने तलवारीने तो केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने गाणी म्हणत रस्त्यावर धिंगाणा घातला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास झाला तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेची माहिती मिळताच, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहून संशयितांनी पोबारा केला; परंतु इंद्रजित दशरथ विश्‍वकर्मा यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत बेकायदेशीररित्या जमाव करून जमावबंदी आदेशाचा भंग, शांततेचा भंग करणे, तलवार बाळगणे याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: One arrested in Nashik for cutting cake with sword and creating disturbance