आंध्रात संपूर्ण गावच ‘बिटरगुंटा’ टोळ्यांचे

Bitargunta
Bitargunta

जळगाव - बॅंक, व्यापारी प्रतिष्ठाने आणि मोठ्या रकमांची देवाण-घेवाण करणाऱ्या संस्थांवर पाळत ठेवून लाखो रुपयांची रोकड लांबविण्यात निष्णात असलेल्या आंध्र प्रदेशातील ‘बिटरगुंटा’ टोळी वेगवेगळ्या राज्यांत कुप्रसिद्ध आहे. आठ ते दहा लोकांची टोळी नियोजनबद्ध सापळा रचून गुन्हे करतात. मोठी रक्कम हाती लागताच खर्चापुरते पैसे ठेवून सर्व रक्कम मूळगावी रवाना करण्यात येते. 

कुठलीही दुखापत न करता नियोजनबद्ध पद्धतीने रोकड लांबविण्यात बिटरगुंटा गॅंग निष्णात आहे. गुन्हेशाखेने पाचोऱ्यातून ताब्यात घेतलेल्या दहा संशयितांच्या टोळीने यापूर्वी धुळे, नाशिक, औरंगाबादसह जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पाचोरा, जामनेर आदी ठिकाणी बॅंकेच्या बाहेर पाळत ठेवून मोठ्या रोकड लांबवल्या असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अटक केलेल्या संशयितांना ओळखले जात आहेत. 

असा साधतात डाव..
आठ ते दहाची टोळी सावज हेरते. दोघेजण बॅंकेतून मोठी रक्कम काढणाऱ्यावर नजर ठेवून बाहेरच्यांना कळवतात. सावज असलेल्या गाडीखाली ऑइल फेकून चालकाचे लक्ष विचलित करत, तोंडात पारले बिस्कीटचा चोथा करून अंगावर थुंकून विष्ठा पडल्याचे सांगत शेतकरी वयोवृद्धांच्या बॅग लांबवणे, मोठी रोकड घेऊन जाणाऱ्यांच्या वाहनाजवळ नोटा रस्त्यावर फेकून लक्ष विचलित करून बॅग लांबवणे.. या सर्व प्रकारातही सावज हेरला जात नसेल तर त्याचे वाहन पंक्‍चर असल्याचे सांगत कारच्या काचेवर गिलोरने छर्रे मारून काच तोडत रोकड पळवली जाते. 

‘चोरी मेरा काम’
या संशयितांकडून लोखंडी छर्रे गिलोर, स्क्रू ड्रायवर आणि इतर अवजारे जप्त करण्यात आली असून नुकत्याच केलेल्या गुन्ह्यातील लाखांची रोकडही पोलिसांनी ताब्यात घेतली. दिवसभर गाव-शहरात हिंडून संपूर्ण कुटुंब रेकी करते मोठे काम झाल्यावर टोळीचा म्होरक्‍या मोठी रक्कम काढून ठरल्याप्रमाणे मानधन इतर सदस्यांना देऊन ठोक रक्कम बिटरगुंटा गावाला रवाना करण्यात येते. 

भाषेची अडचण 
तालुक्‍याच्या ठिकाणी किंवा शहरापासून दूरवरच्या वस्तीत बोअरिंग खोदकाम करणारे, साहित्य विक्रेते असल्याचे सांगत एकत्र कुटुंबासाठी भाड्याने घर मिळवतात. संशयितांना हिंदी-मराठी समजते. मात्र, पोलिसांनी अटक केल्यावर भाषाच कळत नसल्याचे नाटक करतात. त्यामुळे चौकशीतूनही त्यांच्याकडून अपेक्षित माहिती मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com