शेतकऱ्यांनी चार ट्रॅक्‍टर कांदे वाटले मोफत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 जानेवारी 2019

जळगाव - बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादनखर्चही निघत नसल्याचा रोष व्यक्त करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार ट्रॅक्‍टर मोफत कांदे वाटून शासनाचा निषेध केला.

शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, कांद्याला अनुदान वाढवून द्यावे, या मागण्यांसाठी खर्ची (ता. एरंडोल) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. 

राज्यात कांद्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण लक्षात घेता शासनाने कांद्याला अनुदान जाहीर केले; परंतु हे अनुदान अतिशय कमी आहे. तसेच जे शेतकरी आपला कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत विकतील, त्यांनाच अनुदानाची रक्कम मिळणार आहे. जे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कांदा विकतील त्यांना हे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे शासनाने कांद्याला हमीभाव देण्याची गरज आहे. मात्र, शासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने खर्ची परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी चार ट्रॅक्‍टर कांदा जमवून तो आज जळगावला मोफत वाटण्यासाठी आणला. 

आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी रवी देशमुख, बापू माळी, उखा माळी, सुपडू माळी, बापू मराठे, सुभाष माळी, गोपाळ माळी, वसंत वाघ, पंकज वाणी, अमित वाणी, प्रशांत वाणी, रवींद्र वाणी उपस्थित होते.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या अशा 
कांदा उत्पादक शेतकऱ्याला हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळावी, कांद्याला अनुदान रक्कम वाढवून मिळावी, कृषी उत्पन्न बाजार समितीसह व्यापाऱ्यांना कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदानाचा लाभ द्यावा, नदीजोड प्रकल्प ताबडतोब राबवावा, कडधान्य, फळपिके आणि कापूस यांना योग्य हमीभाव द्यावा, कांदा उत्पादन खर्च निघेल इतपत भाव त्वरित जाहीर करावा, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Free Distribution by Farmer