लासलगावला उन्हाळा कांद्याला 5100 रुपयांचा उच्चांकी भाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

परराज्यातून कांद्याची मागणी वाढल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा कांद्याला जास्तीत जास्त पाच हजार 100 रुपये प्रतिक्विंटल सरासरी चार हजार रुपये, तर कमीत कमी एक हजार 501 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याने बळिराजाच्या चेहऱ्यावर प्रदीर्घ कालावधीनंतर हास्य फुलले. बुधवारी सुमारे 11 हजार क्विंटल उन्हाळा कांद्याची आवक येथील बाजार समितीत लिलावासाठी झाली.

लासलगाव - परराज्यातून कांद्याची मागणी वाढल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा कांद्याला जास्तीत जास्त पाच हजार 100 रुपये प्रतिक्विंटल सरासरी चार हजार रुपये, तर कमीत कमी एक हजार 501 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याने बळिराजाच्या चेहऱ्यावर प्रदीर्घ कालावधीनंतर हास्य फुलले. बुधवारी सुमारे 11 हजार क्विंटल उन्हाळा कांद्याची आवक येथील बाजार समितीत लिलावासाठी झाली.

राज्यात अनेक भागांत अतिवृष्टीमुळे कांद्याची लागवड उशिराने झाली असल्याने नवा लाल कांदा येण्यास अजून दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यातच उन्हाळा कांद्याची आवक घटल्याने या आठवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळा कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच हजार 100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

किरकोळ बाजारातसुद्धा कांद्याचे दर 70 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा भिजला. तर नव्या कांद्याची लागवडही होण्यास उशीर झाला. त्यामुळे कांदा बाजारात येण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी चाळीत साठवलेला कांदा विक्रीस काढत आहेत. आवक कमी असल्याने दर वाढले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion rate 5100 rupees in lasalgav