कांदा ओतून रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पन्नास रुपयांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्याची भटकंती

पन्नास रुपयांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्याची भटकंती
अंबासन - 'अहो दादा, पन्नास रुपये का होईना, पण माझा कांदा खरेदी करा. निदान गाडीभाडेतरी थोडेफार दिले जाईल,' अशी केविलवाणी विनवणी बाजार समितीच्या आवारात लिलाव सुरू असताना संबंधित कांदा उत्पादक शेतकरी करीत होता. मात्र व्यापारी शेतकऱ्यांचे काही न ऐकता दुर्लक्ष करत पुढील वाहनाकडे निघून गेले. अखेरीस हताश कांदा उत्पादक शेतकऱ्याने शेजारच्या उपबाजार समितीत कांदा नेला. मात्र तेथेही तोच अनुभव आल्याने उपबाजार समितीच्या आवारातच कांदा ओतून घर गाठले.

आखतवाडे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकरी बारकू पर्बत ह्याळीज यांनी आपल्या गट क्रमांक 211 मध्ये दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली. पेरणीपूर्व मशागतीसाठी व मजुरांची देणी देण्यासाठी पैसा नसल्यामुळे त्यांनी वीस ते बावीस क्विंटल कांदा रोखीने पैसे मिळतील या आशेने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत पीक-अपने विक्रीसाठी नेला. पहाटेपासून वाहन रांगेत उभे करून ठेवले. लिलाव प्रक्रियेवेळी ह्याळीज यांच्या वाहनाजवळ कांदा व्यापारी आल्यावर पन्नास रुपयांपासून बोली लावण्यास सुरवात केली. मात्र एकाही व्यापाऱ्याने बोली लावली नाही. हा माल टाकण्यासाठी आमच्याकडे जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत व्यापारी पुढे निघून गेले. तेथील काही शेतकऱ्यांनी शेजारी सायखेडा उपबाजार समिती असल्याने तेथे कांदा घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

तेथेही कुणी व्यापारी शेतीमाल घेण्यासाठी पुढे येत नव्हते. आपल्या कांद्याच्या मालाची प्रत चांगली असतानाही विकला जात नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला होता. अखेरीस शेतकऱ्याने आणलेला वीस ते बावीस क्विंटल कांदा बाजार समितीच्या आवारात ओतण्याचा निर्णय घेतला. वाहनभाड्याचे पैसे दोन ते तीन दिवसांत उसनवार करून देतो, असे वाहनधारकाला विनंती करून सांगितले.

दरम्यान, पिंपळगाव येथील बाजार समितीच्या आवारात खाली टाकलेला कांदा भरण्यासाठी पन्नास रुपये हमाली मोजावी लागली, तर सायखेडा उपबाजार समितीच्या आवारात कांदा फेकण्यासाठीसुद्धा पन्नास रुपये हमाली दिली.

शेतकऱ्याच्या पिकाला काबाडकष्ट करून मातीमोल विकावे लागत आहे. शेतकऱ्यांची ही कुचंबणा थांबवावी. शासनाने बळिराजाला जगविण्यासाठी बळ द्यावे.
- किशोर ह्याळीज, शेतकरी, आखतवाडे

Web Title: onion rate decrease in nashik