मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षा आता 25 मेपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यानुसार आता मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षा 25 मे पासून सुरू होतील. याआधी परीक्षा 11 मे पासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अपरिहार्य कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड केले असून पदविका, पदव्युत्तर पदवी व प्रमाणपत्र अशा विविध 39 अभ्यासक्रमांचे सुधारित वेळापत्रकाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.

वेळापत्रकाच्या बदलाची नोंद विद्यार्थी तसेच अभ्यास केंद्र व विभागीय केंद्रांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (ता.25) विद्यापीठाने काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात बी.ए., बी. कॉम. अभ्यासक्रमांचे आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एम.एड.च्या परीक्षेचे तसेच एम.कॉम.च्या नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या वेळापत्रकाचा समावेश आहे. एम. कॉम.च्या जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा 4 जूनपासून सुरू होईल.

अमरावतीसह अन्य पारंपरिक विद्यापीठाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. अशा परिस्थितीत मुक्‍त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांमार्फत स्थानिक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली होती. मात्र, पारंपरिक विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने मुक्‍त विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी; असे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.

Web Title: open university exam 25th may start