कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन चिघळले; दोघांना उष्माघाताचा फटका

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन चिघळले; दोघांना उष्माघाताचा फटका
जळगाव - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आज एकत्रित मोट बांधत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊनच निवेदन स्वीकारावे या मागणीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील अडून राहिल्यामुळे हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत चिघळले. शेवटी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर खाली आले आणि त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान, भर उन्हातच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडल्याने राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षासह चोपडा तालुक्‍यातील जिल्हा परिषद सदस्य महिलेला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी राज्यभरात संघर्षयात्रा सुरू केली असून येत्या 15, 16 एप्रिलला ही यात्रा जिल्ह्यात येत आहे. त्यानिमित्त आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी धरणे आंदोलन करण्याचे ठरविले होते. त्यानुसार कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोनला आंदोलन सुरू झाले.

"रास्तारोको'नंतर ठिय्या सुरू
दुपारी दोन-अडीचच्या सुमारास आकाशवाणी चौकात रास्तारोको केल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने महिला कार्यकर्त्यांचा संताप झाला. गेट उघडल्यानंतर आंदोलनकर्ते आवारात गेले. त्या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे व डॉ. सतीश पाटलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली व वादाची ठिणगी पडली. आंदोलनकर्त्यांना निवेदन देण्याचा निरोप जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाला दालनात बोलावले. मात्र, डॉ. पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांनीच खाली यावे व निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका घेतली. या मागणीवर अडून राहत सर्वच आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मुख्य इमारतीसमोर भर उन्हातच ठिय्या मांडून बसले.

समजूत काढल्यावरही ठाम
दरम्यान, गुलाबराव देवकरांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र, श्री. निंबाळकरांनी "मी खाली येणार नाही...' असे सांगत नमस्कार केला व देवकर दालनातून बाहेर पडले. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्यासह आंदोलनकर्त्यांमधील गुलाबराव देवकर, डी. जी. पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांनी सतीश पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही व ठिय्या आंदोलन सुरूच राहिले.

दोघांनाही उष्माघाताचा त्रास
भर उन्हात आंदोलन करताना आंदोलनकर्त्यांची तीव्र घोषणाबाजी सुरू होती. यादरम्यान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश देसले यांना चक्कर आली व ते खाली पडले. दोघा-तिघांनी त्यांना सावरत पाणी दिले. मात्र, त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उष्माघातामुळे त्यांना त्रास झाल्याचे डॉ. राधेश्‍याम चौधरींनी सांगितले. त्यापाठोपाठ चोपडा तालुक्‍यातील जिल्हा परिषद सदस्या नीलिमा पाटील यांनाही त्रास झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तांबेंची मध्यस्थी अन्‌ "राजें'ना मुजरा
आंदोलन सुरू असतानाच सायंकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी फिजिओथेरपीसाठी हॉस्पिटलला निघून गेले होते. नंतर विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात एनआयसी विभागाकडून दाखल झाले. त्या ठिकाणी डॉ. तांबेंशी त्यांनी चर्चा केली. "केवळ आपल्यासाठी मी निवेदन स्वीकारायला येत आहे..' असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकला. यादरम्यान, सतीश पाटलांनीही वरपर्यंत फोनाफोनी केल्याचे समजते. जिल्हाधिकारी निवेदन घ्यायला येताच डॉ. पाटलांनी "राजे आपणांस मानाचा मुजरा..' असे म्हणते जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.

लोकशाही पद्धतीने शांततेत आमचे आंदोलन सुरू होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिला कार्यकर्त्यांशी पोलिसांनी हुज्जत घातली. दोन माजी मंत्री, आमदार, चार माजी आमदार आंदोलनात सहभागी झालेले असताना शासनाचे सेवक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी यायला हरकत काय होती? मुख्यमंत्रीही स्वत: निवेदन स्वीकारतात, मग जिल्हाधिकारी कोण? अखेरीस लोकशाहीचा, सत्याचा विजय झाला व जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येत निवेदन स्वीकारले.
- आमदार डॉ. सतीश पाटील

Web Title: opposition aggressive for loan waiver