Nandurbar MIDC : नवापूर एमआयडीसीला जागा देण्यास विरोध; आदिवासींसाठी लढा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MIDC

Nandurbar MIDC : नवापूर एमआयडीसीला जागा देण्यास विरोध; आदिवासींसाठी लढा!

नवापूर (जि. नंदुरबार) : शहरालगत असलेल्या नांदवण, कोठडा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी त्यांची पूर्वसंमती व पूर्वपरवानगीशिवाय औद्योगिक वसाहत विस्तारासाठी (एमआयडीसी) संपादित करण्यात येऊ नयेत,

शासनाने तसे केल्यास शासनविरोधी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित व शेतकरी यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना मंगळवारी (ता. २१) सकाळी दिले. (Opposition to giving place to Navapur MIDC nandurbar news)

नांदवण, कोठडा परिसरातील सर्व शेतकरी वर्ग एकत्र येऊन तहसीलदारांशी चर्चा करून निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा ः नांदवण, कोठडा येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनी नवापूर एमआयडीसीकरिता संपादित करणार असल्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. याबाबत आदिवासी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. नवापूर एमआयडीसीचा वाढता विस्तार पाहता आदिवासी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भविष्यात रस्त्यावर भीक मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागणार की काय असे दिसून येत आहे.

याबाबत शासन आदिवासी शेतकऱ्यांची दखल घेणार आहे किंवा नाही, संविधानात आदिवासींसाठी पाचवी अनुसूची कलम जाहीर केलेले आहे. त्याचा विसर शासनाला पडत आहे किंवा काय? शासनाला केवळ महसूल मोठ्या प्रमाणात मिळेल यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनी जबरजस्तीने संपादित करून त्यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन हिसकावू पाहत आहे.

शेतजमिनीची मोठी किंमत देण्याचे प्रलोभन देऊन आदिवासी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे असे म्हटले तरी वावगे नाही. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावता येईल, अशी भूमिका शासनाने घेतली पाहिजे. इथे तर आदिवासी शेतकऱ्यांची अधोगती कसे करता येईल हेच शासन धोरण अवलंब करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

निवेदनावर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष भरत गावित, नगरसेवक गिरीश गावित, धुलीपाडा सरपंच उमेश गावित, सुळी सरपंच जालमसिंग गावित, नांदवन सरपंच सुनील गावित, कोठडा उपसरपंच वीरसिंग कोकणी, माजी सरपंच सुरेश गावित, दिलीप कोकणी, रविदास कोकणी, हरीश गावित, योगेश गावित, बिपिन गावित यांच्यासह शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत. या वेळी भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना तज्ज्ञ स्वीकृत सदस्य जयवंत जाधव आदी उपस्थित होते.

"आदिवासी शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आता आमचा लढा आहे. यापुढे शासनाने आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नवापूर एमआयडीसीकरिता त्यांची पूर्वसंमती किंवा पूर्वपरवानगीशिवाय संपादित केल्यास मी आदिवासी शेतकरी म्हणूनच शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शासनाविरोधी अतितीव्र असे आंदोलन करेन." -भरत गावित, भाजप तालुकाध्यक्ष, नवापूर

टॅग्स :NandurbarMIDC