पारनेरला बंधाऱ्याची मोरी तोडण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध 

mori.jpg
mori.jpg

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह आलेल्या पाटबंधारे विभागाच्या आधिकाऱ्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त ग्रामस्थ व शेतकरी यापुढे पाटबंधारे विभागाचे कर्मचारी हतबल होऊन बंधाऱयांच्या बाजूने चारी काढून दिली. पाटबंधारे विभागाने हेतुपुरस्सर कोटम शिवारातील कॉक्रिटकर केलेला बंधार ग्रामस्थांचा विरोध पत्कारून फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत १९९४ मध्ये पारनेर येथील कोटम शिवारात असलेल्या नाल्यात केटीवेअर बांधले गेले. मात्र काही वर्षातच या केटीवेअरला असलेल्या फळ्या निकामी झाल्याने ग्रामस्थांना शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला. परंतू टाळाटाळ केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्यांनाही अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेरीस ग्रामस्थांनी एकजूट होऊन लोकसहभागातून बंधारा दुरूस्ती करण्याचे ठरविले.

अनेक महिलांनी आपले सोनं गहाण ठेवले तर काही शेतकऱ्यांनी पाण्यासाठी दुबती जणावरे विकली. बंधारा पुर्ण झाल्याने गावात काही प्रमाणात पाणीटंचाई दुर झाली तर, शेतीशिवारात हिरवीगार पिके डोलू लागली होती. सद्य परिसरातील गावांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने संबंधित विभागाने जाखोड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचले पाहीजे यासाठी कोणी पाणी अडवू नये असे आदेश काढल्याने ग्रामस्थांनी बंधाऱ्याच्या बाजूने चारी खोदली होती. मात्र पाटबंधारे विभागाला थेट पाणी जाण्यासाठी काँक्रीटने बंद केलेले दरवाजे तोडून पाणी घेऊन जाण्यासाठी आडमुठेपणाची भुमिका घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी पाटबंधारे विभागाकडून महसूल विभाग, पोलिस यंत्रणा व दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले होते. पहाटेपासुन ग्रामस्थ, अबालवृद्ध व महिला केटीवेअरवर उपस्थित झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित पोलिस यंत्रणा, महसूल विभाग व पाटबंधारे विभागाने ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार तासानंतर पाटबंधारे विभागाने सामंजस्याची भुमिका घेत बंधा-याच्या बाजूने खोल चारी काढून घेत वादावर पडदा टाकला.यावेळी विभागीय पोलिस अधीक्षक शशिकांत शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तहसीलदार प्रमोद हिले, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता आर.पी. रामोळे, शाखा अभियंता आर.बी.सुर्यवंशी, एस.एस पाटिल ग्रामस्थांची भेट घेतली. त्र्यंबक देवरे, पुंडलिक देवरे, दत्तात्रय देवरे, साहेबराव देवरे, काशिनाथ देवरे, विश्वास खैरनार, विठ्ठल देवरे, अनिल देवरे, जनार्दन देवरे, रमेश देवरे, कारभारी देवरे, गोविंद देवरे, शरद देवरे, वंदना देवरे, शोभाबाई देवरे, सुनंदा देवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

''प्रशासनाची सामंजस्याची भुमिका असून जाखोड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेवटचे गाव आनंदपूरपर्यंत पिण्यासाठी पाणी गेले पाहीजे. पारनेरचा बंधारा मोठा असून ग्रामस्थांनी फळ्या काढून सिमेंट काँक्रीटीकरण करून पाण्याचा प्रवाह अडविला आहे. त्यामुळे पुढील गावांना पाणी मिळणार नाही. सध्याचे आवर्तन हे पिण्याच्या पाण्याचे असल्याने पाणी अडवून शेतीसाठी न वापरता पिण्यासाठी प्राधान्य द्यावे व शेवटच्या आनंदपूर गावापर्यंत पाणी पोहचावे ही भूमिका आहे. यातून चर्चेने मार्ग काढण्याची प्रशासनाची भूमिका आहे.''
- प्रमोद हिले, तहसीलदार बागलाण

''बंधाऱ्यात एक थेंबही पाणी साठवणार नाही. पाणी आडवा, पाणी जिरवा या माध्यमातून काम केले होते. कामासाठी मायबापड्यांनी सोनं गहाण ठेवले काहीनी दुबती जनावरे विकली आणि बांधकाम केले. पाटबंधारे विभाग हेतुपुरस्सर अन्याय करीत आहे.''
- पुंडलिक देवरे, ग्रामस्थ पारनेर

''शासनाने अडवणूकीचे धोरण अवलंबले आहे. एकीकडे शासन म्हणतं पाणी आडवा पाणी जिरवा दुसरीकडे असे आधिकारी म्हणता बंधारा फोडून पाणी काढा हा न्याय कुठला म्हणायचाय.'' 
- त्र्यंबक देवरे, ग्रामस्थ पारनेर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com