पाकच्या कांद्याने केला वांधा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नाशिक - आखाती देशांमध्ये पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने भारतातील उन्हाळ अन्‌ आताच्या पोळ कांद्याचा वांधा केलाय. अनुदान देऊन यापूर्वी कांद्याची निर्यात झाली असल्याने गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता असतानाही शेतकऱ्यांनी कांद्याची मुबलक लागवड केली खरी; पण त्या तुलनेत निर्यातीकडे सरकारकडून फारशा गांभीर्याने लक्ष न दिल्याने एक महिन्यात उन्हाळ कांदा 25 रुपये किलोवरून दोन ते सहा रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पाकचा कांदा देशात येऊ शकत नसल्याने आयातदारांनी शक्कल लढवत अफगाणिस्तानचा कांदा म्हणून पाकचा कांदा दिल्लीशेजारील राज्यात आणला. पाकचा कांदा बाराशे रुपये क्विंटल या भावाने पोच मिळाला; पण देशातील इंधन दरवाढीमुळे या भागात कांदा पोचण्यासाठी किलोला होणाऱ्या चार ते पाच रुपये वाहतूक खर्चामुळे आपलाच कांदा खायला आपल्या ग्राहकांना परवडत नाही, अशी स्थिती तयार झाली. त्याचवेळी पाकचा कांदा जागतिक बाजारपेठेत कमी भावात मिळत असल्याने भारतीय कांद्याची मागणी फारशी राहिलेली नाही. कांद्याच्या निर्यातीच्या आकडेवारीवरून त्यासंबंधीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास मदत होते.

Web Title: Pakistan Onion