भुसावळच्या मामांचे मसाला पान सातासमुद्रापार 

श्रीकांत जोशी
बुधवार, 20 जून 2018

भुसावळच्या मामांचे मसाला पान सातासमुद्रापार 

भुसावळच्या मामांचे मसाला पान सातासमुद्रापार 

 भुसावळ, ता. 19 ः येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व मामा पान सेंटरचे मालक मामा पाचपांडे यांचे मसाला पान (विडा) सातासमुद्रापारही लोकप्रिय ठरले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील प्रीमॉन्ट शहरातील महाराष्ट्रीयन लोक हे पान खाऊन तृप्त झाले. 
भुसावळला विनायक ऊर्फ मामा पाचपांडे यांची पांडुरंग टॉकीजसमोर पानटपरी होती. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. नववीपासून वडिलांना मदत करण्यासाठी रेल्वेतील नोकरी सांभाळून ते फावल्या वेळेत पानटपरी सांभाळत. शिवाय सामाजिक कामातही पुढाकार घेत. शेगावच्या पायी वारीचे 41 वर्षांपासून ते नियोजन करतात. आयुष्याची 64 वषे त्यांनी पानटपरीवर काम केल्याने पान बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या हातचे पान खाण्यासाठी अनेक शौकीन दुरून येत. आज वयाच्या 78 व्या वर्षीय त्यांचा उत्साह कायम आहे. 
त्यांचा मोठा मुलगा संजय पाचपांडे हा 23 वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. त्याने नुकतेच वडिलांना (मामा) अमेरिकेत बोलावले. तीन महिन्यांसाठी ते अमेरिकेत गेले होते. कॅलिफोर्निया राज्यातील प्रीमॉन्ट शहरात महाराष्ट्रीयन लोकांच्या पुढाकारातून कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशनची शाखा आहे. त्याचे संजय पाचपांडे सदस्य आहेत. शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कलावंतांनी "सुपारी' नाटकाचा सराव करून नंतर सहभोजन करण्याचे ठरले. याचवेळी मामा पाचपांडे तेथे हजर होते व त्यांना पान चांगले बनविता येते, हे कळल्यावर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना चक्क पन्नास पानांची ऑर्डर दिली. तत्काळ त्यांनी होकार दिला. त्यांच्या मुलाने एका केरळी माणसाच्या दुकानातून पान, गुलकंद, चेरी, सुपारी, चुना आदी साहित्य आणले. कानपूर काथ मात्र मुलाच्या घरून घेतला. टेबलावर सर्व पाने पसरवून मामा कामाला लागले. बघता बघता मसाला पान तयार झाले. त्याची सुंदर घडी करून त्यांनी जेवण झाल्यावर प्रत्येकाला दिले. सर्वजण खूश झाले. याबाबतची आठवण सांगताना मामा पाचपांडे म्हणाले, की मूळ पुण्याचे राहणारे महेश मराठे यांनी मला सांगितले, "काका, पानाची चव अप्रतिम होती. असे पान मी आतापर्यंत कधी खाल्ले नव्हते.' याच समाधान वाटते. 

पहिल्यांदाच अमेरिकेत गेलो. तेथे आपल्यासारखी चहाची किंवा पानाची टपरी कुठेही आढळली नाही. बरीच चौकशी केल्यावर एका मॉलमध्ये गुजराथी पटेल नावाच्या व्यक्तीचे पानाचे दुकान होते. तयार विड्याची किंमत विचारली असता दीड डॉलर सांगितली (सुमारे 90 ते 95 रुपये). त्या दिवशी मी खूप मनापासून पाने बनविली. मराठी लोकांना ती खाल्ल्यावर तृप्त झालेले पाहून मलाही मनोमन समाधान वाटले. 
-विनायक ऊर्फ मामा पाचपांडे, भुसावळ 

Web Title: pan