येवला : सदस्यांच्या आक्रमकतेमुळे पंचायत समितीची सभा तहकूब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

- पंचायत समितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, मनरेगाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार व गैरप्रकार सुरू.

येवला : पंचायत समितीत अतिशय मनमानी अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, मनरेगाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार व गैरप्रकार सुरू आहे. या कामाची सखोल चौकशी करावी तसेच कार्यालयात न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व थंब मशीन तातडीने सुरू करावे. या मागणीसाठी आज शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड तर कर्मचारी सभेला दांडी मारत असल्याने राष्ट्रवादीचे गटनेते मोहन शेलार आक्रमक झाल्यामुळे आजची पंचायत समितीची सभा तहकूब करण्याची वेळ प्रशासनावर आली.

विविध गैरकारभाराकडे लक्ष वेधण्यासह चौकशीच्या मागणीसाठी गायकवाड यांनी मासिक आढावा बैठकीवर बहिष्कार टाकून संबंधितांवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली व सभात्याग करण्याचा इशारा दिला होता. कारभार चव्हाट्यावर आणून सभेवर बहिष्कार टाकल्याने प्रशासनावर सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढली आहे.

रोजगार हमी योजनेतील कर्मचारी व अधिकारी यांच्या संगनमताने लाखोंचा भ्रष्टाचार होऊनही कुठलीही कारवाई झालेली नाही. बनावट लाभार्थ्यांचे खाते उघडून एटीएमचा वापर करून संबधित अधिकारी व ठेकेदार यांचेद्वारे परस्पर व्यवहार करण्यात आला आहे.

शौचालय कामकाजाबाबत संबंधित एजन्सी व अधिकारी यांनी सन २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीतील अनियमिततांचा आढावा बैठकीत फेब्रुवारी महिन्यात ठराव करून देखील संबंधितांवर कारवाई झालेली नाही. त्याचप्रमाणे कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचेवर अंकुश राहिलेला नसल्याने ते त्यांच्या मर्जीने कामकाज करतात व अनेकदा अनुपस्थित राहत असून ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे.

कार्यालयातील थंब मशिन बंद असून ते दुरुस्त कारणेबाबतही अधिकारी हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याने गायकवाड यांनी म्हटले. गटविकास सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने ही संपूर्ण वस्तुस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निदर्शनात आणून देण्यात येईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.

शेलारही झाले संतप्त प्रशासनावर कोणाचाही वचक नाही, दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, याच कामात टाळाटाळ केली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यात पारदर्शकता नाही, सर्व काही शंकास्पद आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृहातून उठणार नाही, असा इशारा सदस्य मोहन शेलार यांनी दिल्यावर बिघडलेले वातावरण व सभेला शासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने मासिक सभा तहकूब करण्यात आली.

प्रशासन आता सोमवारी होणाऱ्या सभेत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेततळ्याची अंदाजपत्रक कोणता विभाग तयार करणार याबाबत निर्णय घ्यावा तसेच संपूर्ण तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून प्रत्येक गावात होणाऱ्या खेपांची माहिती दररोज देण्यात यावी व मागील दोन महिन्यात खेडोपाडी पुरविण्यात आलेल्या खेपांची माहिती जाहीर करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchayat Samiti Meeting Adjourned in Yevla