वर्षभरात दीड कोटी सूर्यनमस्कारांचा विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पंचवटी - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला. याच संस्थेच्या विविध शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांनी बोचऱ्या थंडीतही बुधवारी (ता.२४) जागतिक सूर्यनमस्काराचे औचित्य साधत सुमारे दीड कोटी सामुदायिक सूर्यनमस्कार घालत संकल्पपूर्ती केली. अर्थातच साक्षीला होता सूर्यनारायण. या अनोख्या उपक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ व ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थांनी दखल घेत विश्‍वविक्रमाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. या निमित्ताने संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकले आहे.

पंचवटी - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला. याच संस्थेच्या विविध शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांनी बोचऱ्या थंडीतही बुधवारी (ता.२४) जागतिक सूर्यनमस्काराचे औचित्य साधत सुमारे दीड कोटी सामुदायिक सूर्यनमस्कार घालत संकल्पपूर्ती केली. अर्थातच साक्षीला होता सूर्यनारायण. या अनोख्या उपक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ व ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थांनी दखल घेत विश्‍वविक्रमाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. या निमित्ताने संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन हेही या उपक्रमात सहभागी झाले होते.

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे निमित्ताने शहरातील विविध शाळांच्या मैदानावर सूर्यनमस्कार घालत विद्यार्थ्यांनी आरोग्य तंदुरुस्तीचा संदेश दिला. ऐन थंडीतही विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय असाच होता. मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या मैदानावर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळांतील आठ हजार विद्यार्थी एकत्रित आले होते.

मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ‘सूर्यनमस्कार - एक आविष्कार’ हा उपक्रम राबवत वर्षभर एक कोटी सामुदायिक सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडला होता. आजच्या संकल्पपूर्तीसाठी सकाळी साडेसहा ते पावणेसातपासूनच विद्यार्थी, शिक्षक यांची लगबग दिसून आली. 

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह इंदूर येथील परमानंद विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. ओमानंद गुरुजी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, नागनाथ गोरवाडकर, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्‍वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमाताई हिरे, महापौर रंजना भानसी, लक्ष्मण सावजी, उपक्रमप्रमुख अलका कुलकर्णी, प्रद्युम्न जोशी आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजनानंतर विद्यार्थ्यानी सामुदायिक सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक केले. 

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या प्रात्याक्षिकांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव ज्ञानेश्‍वर कुलकर्णी यांनी संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

सूर्यनमस्कारातून अनोखी ऊर्जा
डॉ. ओमानंद गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की सूर्यनमस्काराने शक्ती, बुद्धी व उंची वाढून आयुष्य यशस्वी होते. मन लावून सूर्यनमस्कार केले तर तुम्ही स्वतः प्रकाशित व्हाल व इतरांनाही प्रकाश द्याल, म्हणून सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी नियमित केले पाहिजेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही उपक्रमाचे कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. काकतकर यांनी अध्यक्षीय भाषणात वर्षभरात एक कोटी ४५ लाख सामुदायिक सूर्यनमस्कार घालत दोन विश्‍वविक्रम केल्याने शाळांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचे कौतुक केले. पाहुण्यांचा परिचय प्रसाद कुलकर्णी यांनी करून दिला. डॉ. प्राची सराफ यांनी सूत्रसंचालन केले. प्रद्युम्न जोशी यांनी आभार मानले. शहरातील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्याप्रबोधिनी, भोसला स्कूलमध्येही सूर्यनमस्काराचे विद्यार्थ्यांनी प्रात्याक्षिक केले.

गोदातीरी भाविकांची गर्दी  
सूर्याच्या उत्तरायणाच्या या उत्सवात सूर्याच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. या पूजेसाठी गोदाकाठी भाविकांनी गर्दी केली होती. अश्‍वारूढ सूर्याच्या प्रतिमेचे पूजन आणि दूध, खिरीचा नैवेद्यही दाखविण्यात कुटुंबाची लगबग दिसली.

क्षण आनंदाचा, कौतुकाचा
मंडळाच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात एक कोटी ४५ लाख सूर्यनमस्कार घातले. याची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी, महाराष्ट्राचे प्रमुख दिनेश पैठणकर व वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी डॉ. सुवर्णा श्री आणि नरेंद्र बिंगी यांनी घेतली. सूर्यनमस्कारमध्ये विश्‍वविक्रम केल्याने वरील दोन्ही संस्थांनी अध्यक्ष डॉ. काकतकर आणि कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविले.

विदेशी पाहुण्यांनी वेधले लक्ष
या उपक्रमात ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅन्ड, युक्रेन यांसह अकरा देशांचे तेरा प्रतिनिधी उपस्थित होते. सूर्यनमस्कारातील त्यांचा सहभागही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कार्यक्रमानंतर या परदेशी पाहुण्यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची चर्चा करत अधिक माहिती जाणून घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panchwati nashik news suryanamaskar world record