पांगूळघर झाले पाणीटंचाईमुक्‍त

पांगूळघर झाले पाणीटंचाईमुक्‍त

नाशिक - सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील पांगूळघरासाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंद घेऊन आली आहे. सोशल नेटवर्किंग फोरमच्या जल अभियानांतर्गत पांगूळघरच्या रूपाने अकरावे गाव पाणीटंचाईमुक्‍त झाले.

सोशल फोरमचे तज्ज्ञ, समाजमाध्यमांचा आर्थिक लोकसहभाग आणि ग्रामस्थांचे श्रमदान या ‘एसएनएफ पॅटर्न’ अंतर्गत हे गाव टॅंकरमुक्‍त झाले आहे. अनेक वर्षांपासून गावात दुष्काळाची स्थिती होती. जुलै ते जानेवारीपर्यंत विहिरींना पाणी असायचे. पण जानेवारीनंतर गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते. टॅंकरने पाणीपुरवठा अथवा एक किलोमीटर खोल दरीतील झऱ्यांवर तासन्‌तास बसून पाणी मिळवावे लागत होते. पाणी प्रश्‍नाची माहिती सोशल नेटवर्किंग फोरमला मिळाल्यावर फोरमच्या टीमने गावाची पाहणी करत प्रश्‍न सोडविण्याचे आवाहन स्वीकारले. काही महिन्यांपासून पांगूळघर येथील पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी एसएनएफ टीम प्रयत्नशील होती. या प्रयत्नांना यश मिळाल्याने गावात पाणी पोचले असून, प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. दिवाळीत लोकार्पण होत असल्याने गावातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, शैक्षणिक साहित्य, नवीन कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. लोकार्पणास महापालिकेतील अधिकारी जीवन सोनवणे, विजया सोनवणे, प्रादेशिक परिवहन विभागाचे राहुल कदम, संदीप निमसे, फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, अभियंता प्रशांत बच्छाव, डॉ. पंकज भदाणे, संदीप बत्तासे, रामदास शिंदे, डॉ. उत्तम फरताळे, प्रा. सुमती पवार, डॉ. विशाल पवार आदींसह सरपंच कमल गवळी उपस्थित होत्या.

असा सोडवला पाणीप्रश्‍न
गावाची पाहणी करून भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने गावापासून काही अंतरावर पाण्याची शक्‍यता तपासली. दरीतून वाहणाऱ्या नदीच्या काठावर उन्हाळ्यातही पाणी टिकू शकेल, अशा जागेचा शोध घेतला. पाण्याच्या स्त्रोतांचा अंदाज आल्यावर ग्रामस्थांच्या श्रमदानातून विहीर खोदल्यावर दहा फुटांवर पाणी लागले. खोल दरीतील विहिरीतून उंचावर वसलेल्या गावात वीजपंपाने पाणी उचलून गावातील टाकीपर्यंत पाणी पोचवले व पांगूळघर कायमस्वरूपी टॅंकरमुक्त झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com