‘पारख’कडून ताबा घेतलेल्या भूखंडाबाबत प्रशासन उदासीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

महात्मा गांधी मार्गावरील भूखंडावरील अतिक्रमण काढण्यात आले. या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाने दोन पहारेकरी नियुक्त केले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत संरक्षक भिंत बांधण्यात येईल.
- मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

नाशिक - महात्मा गांधी मार्गावरील जिल्हा परिषदेच्या भूखंडावर सात वर्षांपासून पारख इलेक्‍ट्रॉनिक्‍सने ताबा ठेवला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने महापालिकेच्या मदतीने भूखंडावरील अतिक्रमणावर हातोडा मारला खरा, पण या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याबाबत उपाययोजना करण्याबाबत जिल्हा परिषद 

प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर दुसऱ्या दिवशीही भूखंडावरील  सामान ‘जैसे थे’ होते. केवळ एक फलक लावून प्रशासनाने जबाबदारीतून 
मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. 

महात्मा गांधी मार्गावरील जिल्हा परिषदेच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याबाबत सर्वसाधारण सभेत अनेकदा चर्चा होऊन ठराव झाले. न्यायालयीन बाब असल्याने कारवाई करता येत नव्हती. अखेर न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर जिल्हा परिषदेने अतिक्रमण जमीनदोस्त केले. या कारवाईबद्दल प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक सुरू आहे; परंतु आतापर्यंत जिल्हा परिषदेला न्यायालयाच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या ‘पारख’कडून धोका असल्याने भूखंडावर तत्काळ सरंक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे. तो धोका ओळखून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला भूखंड संरक्षित करण्याबाबत सूचनाही केल्या. 

प्रशासनानेही तेथे संरक्षक भिंत बांधण्यात येईल, असे जाहीर केले. प्रत्यक्षात त्या भूखंडावर फलक लावण्यापलीकडे प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नाही. यामुळे पदाधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Parak check by the administration depressed about the plot