Dhule News : मिरवणुकीला रात्री बारापर्यंत परवानगी; सलोखा जपण्याचे आवाहन
धुळे : महाशिवरात्री, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, वीर एकलव्य जयंती तसेच मुस्लिमधर्मीयांचा शरीफ मिराज या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी,
शांतता टिकून राहावी आणि जातीय सलोखा जोपासला जावा, अशी अपेक्षा व्यक्त अधिकारी, लोकप्रतिनिधींनी या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला रात्री बारापर्यंत परवानगी दिली जात असल्याची माहिती दिली. (Peace committee meeting held by administration at collectors office procession is allowed till midnight dhule news)
जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी (ता. १६) शांतता समितीची बैठक झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड अध्यक्षस्थानी होते. महापौर प्रतिभा चौधरी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण,
निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार गायत्री सैंदाणे प्रमुख पाहुणे होते. शिवजयंतीसाठी शोभायात्रा आणि वाद्यवृंदाना रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात येईल, अशी माहिती श्री. बारकुंड यांनी दिली.
शांततेकामी ग्वाही
माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी यांनीही शांतता राखण्यासाठी सहकार्याची ग्वाही दिली. नगरसेवक हिरामण गवळी यांनी शहरात शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांना पोलिस प्रशासनाने मध्यरात्रीपर्यंत अर्थात रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
शिवप्रेमी तरुण उत्साहात मिरवणुका काढतात, त्यासाठी अनेक दिवसांची तयारी आणि आर्थिक भार ते उचलतात. त्यामुळे आनंदोत्सवासाठी पुरेसा वेळ दिला जावा, अशी अपेक्षा नगरसेवक गवळी यांनी व्यक्त केली. शांतता समितीच्या सदस्यांसह निरनिराळे पक्ष, संघटना, मंडळाच्या प्रतिनिधींनी योग्य त्या सूचना मांडल्या.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
बारकुंड यांची अपेक्षा
पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले, की सण, उत्सव हे नियम व अटी-शर्तींचे काटेकोर पालन करून साजरे व्हावेत. शांतता व शिस्त पाळली जावी. शिवजयंतीला रात्री बारापर्यंत मिरवणुकांना परवानगी आहे. नंतर डीजे व अन्य वाद्ये मिरवणूक आयोजकांनी स्वत: बंद करत पोलिस यंत्रणेस सहकार्य करावे. पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त असेल.
पोलिसांना मंडळांच्या स्वयंसेवकांनी सहकार्य करावे. त्यामुळे मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडू शकेल. काही कार्यक्रम आयोजकांनी मूर्ती, पुतळे वाटपाचे नियोजन केले आहे.
त्यांनी वाटपस्थळी मूर्ती, पुतळ्यांचे पावित्र्य, सुरक्षितता राखली जाईल याविषयी काळजी घ्यावी. आवश्यक तेथे वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच रात्रीची गस्त वाढविण्यात येईल, असे श्री. बारकुंड म्हणाले.
वीजपुरवठा सुरळीत
महापालिकेतर्फे आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील, असे महापौर चौधरी यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, की सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेने स्वच्छता विभागाला निर्देश द्यावेत. नागरिकांनी सण, उत्सव शांततेत साजरे करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. पोस्टर, बॅनरसाठी संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक राहील.
अपर पोलिस अधीक्षक काळे यांनी प्रास्ताविक केले. वाहतूक पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी आभार मानले. माजी आमदार शरद पाटील, साबीर शेख, वसीम बारी, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, उमेश महाजन, आकाश परदेशी, अॅड. सचिन जाधव, मोहन मोरे, कुणाल चौधरी आदी उपस्थित होते.
जुने धुळे समितीचा सत्कार
जुने धुळे शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदानासह, आभा कार्ड, शालेय साहित्यवाटप, रांगोळी स्पर्धा आदी निरनिराळे उपक्रम राबविले जातात. यातून बांधिलकी आणि एकोपा जोपासला जातो. या कार्याबद्दल समितीचे आकाश परदेशी, अॅड. सचिन जाधव, उमेश महाजन यांचा पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी सत्कार केला आणि अशा समितीच्या आदर्शवत कार्याचे अनुकरण करावे, असे त्यांनी सूचित केले.