अमळनेर: भिलाली बंधाऱ्यावर ग्रामस्थांचे उपोषण सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

भिलाली बंधाऱ्याचे 80 टक्के काम झाले आहे. उर्वरित 20 टक्के काम सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी बंद पडले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास पाणी अडविणे शक्‍य नाही. यासाठी लवकर सुधारीत मान्यता मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

अमळनेर : भिलाली (ता. पारोळा) येथे बोरी नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम बंद पडले आहे. या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता तत्काळ मिळावी या मागणीसाठी सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी बंधाऱ्यावरच आज सकाळी आठपासून बेमुदत उपोषण सुरू केले. 

भिलाली बंधाऱ्याचे 80 टक्के काम झाले आहे. उर्वरित 20 टक्के काम सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी बंद पडले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास पाणी अडविणे शक्‍य नाही. यासाठी लवकर सुधारीत मान्यता मिळावी, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्याची मूळ प्रशासकीय मान्यता 3 कोटी 26 लाख 45 हजार रुपये होती. बंधाऱ्याची जलक्षमता 1. 16 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. कामाची मुदत 18 महिन्यांची होती. सद्यःस्थितीत 80 टक्के काम झाले आहे. 2018 अखेर 3 कोटी21 लाख 40 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे.

सुधारीत मान्यता 10 कोटी 79 लाख 88 हजार रुपये इतकी आहे. मात्र, हे काम फक्‍त 20 टक्केच शिल्लक असून, मान्यतेअभावी बंद पडले आहे. यास तत्काळ मंजुरी मिळण्याची गरज असून, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. उपोषणास सरपंच अनिता पवार, उपसरपंच दीपक पाटील, शिवाजी पाटील, विश्‍वास पाटील, डॉ. पांडुरंग पाटील, निंबा पाटील, दत्तू पाटील, शरद पाटील, सतीश पाटील, नंदू पाटील, गोरख पाटील आदींसह दोनशे ग्रामस्थांचा समावेश आहे.

Web Title: people agitation in Bhilali