मलमूत्रयुक्त पाण्यामुळे संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

जुने नाशिक - वडाळा रोडवरील गोठ्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी आठ दिवसांपासून रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या चिश्‍तिया कॉलनी आणि अन्य भागातील नागरिकांनी मंगळवारी (ता. ८) सकाळी अकराला वडाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.

जुने नाशिक - वडाळा रोडवरील गोठ्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी आठ दिवसांपासून रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे संतप्त झालेल्या चिश्‍तिया कॉलनी आणि अन्य भागातील नागरिकांनी मंगळवारी (ता. ८) सकाळी अकराला वडाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.

वडाळा रोडवर अनेक गोठे आहेत. गोठ्यांतील मलमूत्रयुक्त पाणी महापालिकेच्या ड्रेनेजमध्ये सोडले आहे. आठ दिवसांपासून चेंबर तुंबल्याने मलमूत्रयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. रात्री अंधारात पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरून अपघात होत आहे. सोमवारी (ता. ७) रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध दांपत्याचा अपघात झाला. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेला कळवून समस्या सुटली नाही. त्यामुळे मंगळवारी (ता. ८) सकाळी नागरिकांनी रास्ता रोको केला. याबाबत माहिती मिळताच मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या तक्रारी समजून घेतल्या. महापालिका अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावले. एस. आर. वंजारी, श्री. महाडीवाले घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. ड्रेनेज विभागाचे अत्याधुनिक वाहनासह कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाइनची दुरुस्ती सुरू केली. गोठेधारक मोठ्या प्रमाणावर शेण, कचरा ड्रेनेजमध्ये टाकत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्यांना नोटीस बजावूनही ते ऐकत नसल्याचेही महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी रास्ता रोको मागे घेऊन मुंबई नाका पोलिसांना निवेदन दिले. त्यावरून मुंबई नाका पोलिसांत गोठाधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

गोठेधारकांनी यापुढे काळजी घेण्याचे आश्‍वासन देऊन गोबरगॅस प्रकल्प राबवून त्यात शेण, कचरा टाकण्यात येईल. फक्त पाणी ड्रेनेजमध्ये सोडण्यात येईल, असे सांगितले. 

सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीस गोठेधारक जबाबदार आहेत. गोठेधारकांना यापूर्वी नोटीस बजावली आहे. तरीही असे प्रकार केले जातात. समस्या सोडविण्याचे शक्‍य तितके प्रयत्न केले जातील.
- एस. आर. वंजारी, महापालिका अधिकारी

गोठेधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना समजही दिली आहे. तरीही त्यांनी असे प्रकार केले, तर पुन्हा नोटीस बजावून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहे.
- सुनील नंदवाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

आठ दिवसांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात आहेत. त्याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. 
- शाहीन मिर्झा, नगरसेविका

Web Title: people road close agitation for Excretory water