'नो क्राइम डे'साठी पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

भरदिवसा होत असलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्‍कील झाले आहे. त्याचवेळी सातपूरला भरदिवसा कामगारांवर चाकूहल्ले सुरू झाले. दोन दिवसांपूर्वी कर्मचारी असलेल्या तरुणीवर सातपूरला भीषण चाकूहल्ला झाला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतही घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे 'नो क्राइम डे केव्हा?' असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नाशिक : 'नो हॉर्न डे'साठी पोलिसांनी जगजागृतीची मोहीम राबविली असताना शहरातील वाढत्या घरफोड्या, टोळ्यांचे निरपराध तरुण-तरुणींवर हल्ले वाढू लागल्याने 'नो क्राइम डे केव्हा?' हे विशेष वृत्त आज 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत पोलिस आयुक्तालय हद्दीत आज मध्यरात्रीपर्यंत पुन्हा 'ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन' राबविले. या मोहिमेत पोलिसांनी गोदा पार्कसह मोकळी मैदाने व झोपडपट्टी परिसरातून 22 संशयितांची धरपकड केली. संपूर्ण मे महिना ही मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांची संधी साधत पंचवटी, नाशिक रोड, सिडको, इंदिरानगर भागात रोज एकतरी घरफोडी होत आहे. चोरट्यांनी विविध घटनांमध्ये किमान 25 तोळे सोने साफ केले आहे. अगदी चित्रपट पाहायला गेलेली घरेही चोरटे साफ करत आहेत. हिरावाडीत बाहुबली चित्रपट पाहायला गेलेल्या कुटुंबाचा फ्लॅट फोडत चोरट्यांनी पाच लाखांच्या सोन्यावर डल्ला मारला. भरदिवसा होत असलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्‍कील झाले आहे. त्याचवेळी सातपूरला भरदिवसा कामगारांवर चाकूहल्ले सुरू झाले. दोन दिवसांपूर्वी कर्मचारी असलेल्या तरुणीवर सातपूरला भीषण चाकूहल्ला झाला. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतही घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे 'नो क्राइम डे केव्हा?' असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार चार दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. आज दोन सत्रांत ही मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी पाच ते सात या वेळेत काही पोलिस ठाण्यांतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले तर रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत व्यापक मोहीम राबविली गेली. यात विशेष करून गोदा पार्क, झोपडपट्टी परिसर लक्ष्य करण्यात आला. तसेच टवाळखोर आणि मद्यपींवरही कारवाई करण्यात आली. परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर, म्हसरूळ, पंचवटी, आडगाव, भद्रकाली परिसरात 'ऑल आउट' मोहीम राबवून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. याचप्रमाणे परिमंडळ दोनमध्ये नाशिक रोड, उपनगर, सिडको, इंदिरानगर या परिसरतही मोहीम राबविण्यात आली. मध्यरात्रीपर्यत मोहीम सुरू होती.

Web Title: police combing operation for no crime day