Dog
Dog

पोलिस श्‍वान ‘टायगर’मुळे दोन मारेकऱ्यांना जन्मठेप

नाशिक - राजेवाडी शिवारात (हरसूल) येथे कुत्रा भुंकला म्हणून त्यास ठार मारणाऱ्यांना जाब विचारला म्हणून त्याचा खून करून मृतदेह पाझर तलावात फेकून देणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती यू. एम. नंदेश्‍वर यांनी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. रावजी आवजी टोपले (वय ४९), सुभाष देवराम टोपले (वय ४१, दोघे रा. राजेवाडी शिवार, हरसूल, ता. त्र्यंबकेश्‍वर) असे आरोपींची नावे असून, त्यांनी सहादू अमृता टोपले (वय ५५, रा. राजेवाडी शिवार, हरसूल) यांचा खून केला होता. गुन्ह्याची उकल करण्यात पोलिस दलाचा श्‍वास ‘टायगर’ची प्रमुख भूमिका राहिली होती. 

सहादू टोपले हे ६ मार्च २०१५ मध्ये राजेवाडी शिवारातून त्यांचा राजा नावाच्या कुत्र्यासमवेत जात होते. त्या वेळी समोरून आरोपी रावजी टोपले व सुभाष टोपले हे आले असता, सहादू यांचा कुत्रा त्यांच्यावर भुंकला आणि चावाही घेतला होता. त्यामुळे दोघा आरोपींनी कुत्र्याला ठार मारले होते.

त्याचा जाब विचारण्यासाठी सुहादू टोपले गेले असता, दोघांनी त्यांना काठीने जबर मारहाण करून खून केला. त्यानंतर सहादू टोपले यांच्या मृतदेहाला ३५ किलो वजनाचा दगड बांधून त्यांचा मृतदेह सावरदरा पाझर तलावामध्ये फेकून दिला होता. ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. कीर्तिकर यांनी श्‍वान विभागाची मदत घेत तपास केला. त्यासाठी पोलिस श्‍वान ‘टायगर’ व हॅन्डलर एन. बी. बघे यांनी घटनास्थळी टायगरला गंध दिला असता, त्याने थेट आरोपींच्या घरापर्यंत माग काढला होता. तसेच टायगरने मृत टोपले यांचे बूट, दात आणि रक्ताचे डागही शोधून काढले होते. 

सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी साक्षीदार व पुरावे सादर केले. सहाय्यक निरीक्षक संजय आहेर, संतोष गोसावी यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com