बॅंक दरोड्यातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

चाळीसगाव - बॅंकेच्या दरोड्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पुणे पोलिसांवर आरोपीने गोळ्या झाडल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांच्या दोन गोळ्या लागून आरोपी जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

चाळीसगाव - बॅंकेच्या दरोड्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पुणे पोलिसांवर आरोपीने गोळ्या झाडल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात पोलिसांच्या दोन गोळ्या लागून आरोपी जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

राहू (ता. दौंड, जि. पुणे) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेवर दहा सप्टेंबरला दरोडेखोरांनी दोघा सुरक्षारक्षकांना मारहाण केली. गॅस कटरच्या साहाय्याने बॅंकेच्या खिडकीचे गज कापून तिजोरीतील 65 लाख 57 हजार रुपये चोरून नेले. या गुन्ह्याचा तपास पुणे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सुरू केल्यानंतर या गुन्ह्यात सचिन इथापे ऊर्फ शिवाजी पाटील (वय 26) व ज्ञानेश्‍वर रोकडे ऊर्फ दीपक देशमुख हे दोघे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते. यातील सचिन इथापे हा चाळीसगावला धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोलपंपाच्या मागे माधवनगरात एक वर्षापासून वास्तव्याला असल्याची गुप्त माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक अंकुश माने हे सहायक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, बाळासाहेब सकाटे, नीलेश कदम, अजय कदम, लिकायत मुजावर, महिला हवालदार पल्लवी गायकवाड व मनीषा धमरे या आपल्या पथकासह चाळीसगावात आले. गुप्तपणे चौकशी केल्यानंतर शिवाजी पाटील या नावाने राहणारा दरोडेखोर हा सचिन इथापेच असल्याचे समजल्यानंतर हे पथक आज सकाळी सातच्या सुमारास त्याच्या घरावर अचानक दाखल झाले.

आपल्याला पकडण्यासाठी पोलिस आल्याचे लक्षात येताच, सचिन इथापे याने घराच्या मागच्या बाजूने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पळत असताना त्याने त्याच्याजवळील "कार्बाईन गन'मधून पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या. उपनिरीक्षक अंकुश माने यांनी सावध पवित्रा घेत, मोठ्या शिताफीने सचिन इथापेच्या पायावर आपल्या बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या त्याच्या कमरेच्या खाली डाव्या बाजूच्या पायाला चाटून गेल्याने तो खाली पडला व लगेचच त्याला ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल केले.

सहा काडतुसे जप्त
संशयित सचिन इथापेची "कार्बाईन गन' पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यात सहा गोळ्या आढळल्या. एकाचवेळी 20 गोळ्यांची क्षमता असलेल्या या "कार्बाईन गन'मधील बारा गोळ्या सचिनने कुठे वापरल्या, याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, सचिनवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, संशयित सचिन हा मूळचा कोंडेगव्हाण (ता. पारनेर, जि. नगर) येथील रहिवासी असून, त्याने यापूर्वीही अनेक ठिकाणी दरोडा टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे. चाळीसगावला आई व पत्नीसोबत तो एक वर्षापासून शिवाजी पाटील नावाने राहत होता.

Web Title: police fires at absconding accused from pune

टॅग्स