मेहुणबारे येथे पोलिसांच्या दारू अड्ड्यांवर धाडी 

दीपक कच्छवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

कारवाईचे महिलांमधून स्वागत 
ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊनही दारूबंदीचे ठराव देखील करण्यात आले आहे. या ठरावांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. नव्याने आलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहे. या कारवाया अशा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे.

वडगाव लांबे, भवाळी, अलवाडी येथून ३९ हजारांचे रसायन नष्ट 
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - येथील पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या सचिन बेंद्रे यांनी गावठी दारू विक्रेत्यांवर आज धडक कारवाया करून बडगा उगारला. वडगाव लांबे, भवाळी व अलवाडी (ता. चाळीसगाव) या गावांमध्ये हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर छापा टाकून सुमारे ३९ हजार तीनशे रुपयांचे रसायन जप्त करून जागेवर नष्ट केले. या कारवायांचे विशेषतः महिलांमधून कौतुक होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या कारवायांमध्ये सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

मेहुणबारे पोलिस ठाण्यांतर्गत ५५ गावे असून यापैकी बहुतांश गावांमध्ये गावठी दारूसह देशी विदेशी बनावट दारूची बिनधास्त विक्री होत आहे.

दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने अनेक गावांमधील महिलांनी दारूबंदीचा मागणी केली आहे. काही गावांनी तर तसे ठरावही केले आहेत. मात्र, तरीही दारू विक्री पूर्णपणे बंद झालेली नाही. येथील पोलिस ठाण्यात नव्याने आलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी रुजू होताच, दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील खाऱ्या नाल्याजवळ गावठी हातभट्टीवर दारू तयार होत असल्याची गोपनीय माहिती श्री. बेंद्रे यांना मिळताच त्यांनी सापळा रचून अचानक छापा टाकला. यात १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी कच्चे रसायन जागेवरच नष्ट केले. या ठिकाणी संशयित आरोपी प्रल्हाद देवराम सूर्यवंशी (वय ३५) याला अटक केली. रहिपुरी शिवारात १२ हजार दोनशे रुपयांचे कच्चे रसायन, ५ हजार सहाशे रुपयांचे पक्के रसायन व १ हजार दोनशे रुपयांची तीस लिटर तयार दारू असा एकूण १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. भवाळी येथील एकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. अलवाडी येथे एका महिलेला भिलाटी भागात घराच्या आडोशाला दारू विकताना रंगेहाथ पकडले. सुमारे आठशे रुपये किमतीची तयार दारू महिलेकडून जप्त केली. ही कारवाई सचिन बेंद्रे यांच्यासह हवालदार हेमंत शिंदे, छबुलाल नागरे, मिलिंद शिंदे, संजय पाटील, गोरख चकोर, शैलेश माळी, सिद्धांत सिसोदे यांनी केली. 

राज्य उत्पादन शुल्क नावालाच 
जळगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आठ महिन्यांपूर्वी वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथे घरात असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. चाळीसगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पाहिजे तशा कारवाया केल्या जात नाही. त्यामुळे त्यांच्या कामावर आता ग्रामस्थांना विश्वास राहीला नसून चाळीसगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग फक्त नावालाच उरला आहे. दारू विक्रेत्यांशी त्यांचे साटेलोटे असल्यानेच कारवाया होत नाहीत. 

कारवाईचे महिलांमधून स्वागत 
ग्रामीण भागात खुलेआम विकल्या जाणाऱ्या गावठी दारूमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेऊनही दारूबंदीचे ठराव देखील करण्यात आले आहे. या ठरावांना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. नव्याने आलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहे. या कारवाया अशा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी महिलांमधून होत आहे. 

परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर पोलिसांना तातडीने कळवावे जेणेकरुन कारवाई करता येईल. याकामी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे. प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाया सुरूच राहतील. 
- सचिन बेंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Raid on Liquor Depo crime