दोन हजार समाजकंटकांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा पोचू नये, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलातर्फे आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात असून, आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ३६५ समाजकंटाकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक - लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेला बाधा पोचू नये, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलातर्फे आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात असून, आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ३६५ समाजकंटाकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात ४७ जणांना तडीपार करण्यात आले आहे, तर ५८ जणांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस अधीक्षिका डॉ. आरती सिंह यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यात ४० पोलिस ठाण्यांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिस ठाणेनिहाय अवैधरित्या होत असलेला दारू व्यवसाय, दहशत पसरविणारे, सराईत गुन्हेगार, अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. माहिती मिळताच ठिकठिकाणी छापे टाकले जात असून, मुद्देमाल जप्त केला जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील मतदान केंद्राची संपूर्ण माहिती पोलिस दलाकडून घेण्यात आली असून, त्यानुसार पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील आठ उपविभागीय पोलिस हद्दीत दररोज कोम्बिंग राबवून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४७ जणांना तडीपार करण्यात आले असून, ५८ जणांविरुद्ध प्रस्ताव तडीपारीसाठी सादर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील दोन हजार ३६५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. आर्मॲक्‍टचे जिल्ह्यात २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात पाच पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे, ५० तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. मुंबई दारूबंदी कायद्यान्वये ग्रामीण पोलिसांकडून ३१८ केसेस दाखल करण्यात आल्या असून, यात १७ लाख रुपये किमताचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पेठ तालुक्‍यातील पिठुंदी येथे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी चारचाकी वाहनातून १८ लाख ९० हजार रोख रुपयेही जप्त केले.

Web Title: Police Society thorn Crime Criminal Tadipaar