तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर शहरात चोख नाकाबंदी

नाशिक - अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असताना पोलिसांनीही शहरात ठिकठिकाणी चोख नाकाबंदी वाढविली आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या आनंदात मद्यपाशन करून वाहने हाकून अपघाताला निमंत्रण देणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून ब्रेथ ॲनालायझरच्या मदतीने तपासणी करून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. 

नववर्षाच्या स्वागतासाठी शनिवारी (ता. ३१) शहरभरातील तरुणाई सज्ज झाली असून, त्यासाठी रंगीतसंगीत नियोजनही सुरू आहे. थंडीचे वातावरण असल्याने अधिक जोशात असलेल्या तरुणाईने हॉटेल्समध्ये जेवणासह मद्यपानाचेही बेत आखले आहेत.

शहरातील हॉटेल, बिअर बार, ढाबेचालकांनीही आकर्षक रोषणाई करीत ग्राहकांसाठी सवलतीच्या योजनांसह पार्ट्यांसाठी व्यवस्था केली आहे. यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या या पार्ट्यांमध्ये अनेकांना सहभागी होण्याचा मोह आवरत नाही. 

मात्र, त्यानंतर घरी परतताना अतिमद्याच्या नशेत वाहनचालकांमुळे अपघात वा पार्ट्यांमध्ये वादविवाद घडत असतात. यासाठी पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम राबविण्यास आतापासून प्रारंभ केला आहे. गंगापूर रोड, त्र्यंबक रोडसह शहरातील हॉटेल, ढाबे, बिअर बार अशा ठिकाणी पोलिसांची नजर आहे. 

रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या मद्यपींची ब्रेथ ॲनालायझर मशिनने तपासणीही केली जाणार असून, मद्यपान केलेले असल्यास दंडच ठोठावला जाणार आहे. तसेच, पार्ट्यांमध्ये वा रस्त्यावर मद्याच्या नशेत छेडछाडीचे प्रकार वा हाणामाऱ्यांच्या घटना घडण्याची शक्‍यता गृहित धरून साध्या वेशातील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. 

मद्यपान करून वाहने चालविणे गुन्हा आहे. नववर्षाचे स्वागत आनंदाने करा; पण अपघात टाळणे गरजेचे आहे. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

Web Title: police watch on vehical