कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे ! युवा सेनेचे पालकमंत्री सत्तार यांना साकडे 

रमाकांत घोडराज
Thursday, 11 February 2021

धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन होऊन ५० वर्षे झाली आहेत. त्यामुळे येथे सर्व प्रकारची साधन-सामग्री, जागा उपलब्ध आहे.

धुळे ः राज्यात चार जिल्ह्यांमध्ये नवीन कृषी विद्यापीठे प्रस्तावित आहेत. हे नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच व्हावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करा, अशी मागणी युवा सेनेने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. 

नवीन कृषी विद्यापीठांसाठीच्या संभाव्य जिल्ह्यांमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिकचा अंतर्भाव आहे. मात्र, हे विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच होणे गरजेचे आहे. धुळ्यात विद्यापीठ झाल्यास शेती, शेतकरी, शेतमजूर, कामगार व सामान्य नागरिकांसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. धुळे शहरातून तीन महामार्ग जातात. त्यामुळे दळणवळणाची मोठी सोय आहे. अक्कलपाडा व तापी प्रकल्पाने पाण्याची टंचाई दूर झाली आहे. धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन होऊन ५० वर्षे झाली आहेत. त्यामुळे येथे सर्व प्रकारची साधन-सामग्री, जागा उपलब्ध आहे. इतर पूरक बाबीसुद्धा उपलब्ध आहेत. अधिकची जागा लागल्यास ती उपलब्ध होऊ शकेल.

 

नजीकच्या चार ते पाच जिल्ह्यांना त्याचा मोठा फायदा होईल. विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध होतील. विकासात मागे राहिलेल्या जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे शासनस्तरावर प्रयत्न करून धुळे जिल्ह्याला न्याय मिळवून द्यावा, असे युवा सेनेने म्हटले आहे. मागणीचे निवेदन अॅड. गोरे यांनी पालकमंत्री सत्तार यांना दिले. साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, अतुल सोनवणे आदी उपस्थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news dhule agricultural unuiversity dhule yuva sena demand