धुळे तालुक्‍यात काँग्रेसचे विजयी वारे; तर भाजप नेत्यांवर मंथनाची वेळ ! 

एल. बी. चौधरी
Tuesday, 19 January 2021

निवडणुकीपुर्वीही महाआघाडीच्या तालुक्यातील नेत्यांनी एकमेकांना विश्वासात घेतले नाही. आजही महाआघाडीच्या नेत्यांनी आपल्यातील अंतर राखून ठेवले आहे.

सोनगीर ः धुळे तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्ता दिल्यानंतर मतदाराचे विचाराचे वारे भाजपकडून पुन्हा काँग्रेसकडे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. यापार्श्‍वभूमीवर वरिष्ठ भाजप नेत्यांना विचार करण्याची वेळ आली असून पुन्हा संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हे स्पष्ट झाले आहे. 

आवश्य वाचा- पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात तयार झालेला 'थाळसर-बांगसर'या लघुपपटाला राष्ट्रीय पुरस्कार
 

धुळे तालुक्यातील ६६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले. सहा ग्रामपंचायती यापूर्वी बिनविरोध झाल्या. तालुक्यात ७७.१७ टक्के मतदान झाले. काँग्रेसने ६१, भाजपने २१, शिवसेनेने १८ तर राष्ट्रवादी काँग्रेसने १५ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळेल असा दावा केला आहे. प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती व विविध पक्षांचा दावा यात मोठी तफावत असली व दावे फुगवून सांगितले जात असले तरी तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले यात शंका नाही. 

मते बदलली कशी? 
लोकसभा निवडणुकीत धुळे तालुक्यातील ग्रामीण भागाने भाजपला भरभरून मते दिली. विधानसभेला याच ग्रामीण भागाने काँग्रेसला पसंती दिली. गतवर्षी जानेवारीत झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत मतदार पुन्हा भाजपकडे गेले. अवघ्या एका वर्षात मतदारांनी भाजपला झिडकारून काँग्रेसला जवळ केले. भाजपने याबाबत मंथन करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत जनतेला विकासकामे न दिसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत तालुक्यातील कोणताही बडा नेता नसताना आणि भाजपकडे बड्या नेत्यांची कमतरता नसताना काँग्रेसचे हे यश उठून दिसते. भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीकडे फारसे लक्षच दिले नाही. हे दिसून येते. 

आवर्जून वाचा- प्रचाराला गावात न फिरला..न मतदान केले; तरी 'तो' निवडणूकीत विजयी झाला, हे कसे झाले शक्य ? वाचा सविस्तर 
 

महाआघाडीची फारकत 
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील महाआघाडीची सत्ता राज्यात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडी दिसून आली नाही. निवडणुकीपुर्वीही महाआघाडीच्या तालुक्यातील नेत्यांनी एकमेकांना विश्वासात घेतले नाही. आजही महाआघाडीच्या नेत्यांनी आपल्यातील अंतर राखून ठेवले आहे. एकाही ग्रामपंचायतीवर महाआघाडीची सत्ता आली असा दावा कोणीच केला नाही. 

पक्षांच्या दाव्यात कितपत तथ्य 
ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वीही आणि त्यानंतरही कोणत्याही पक्षांच्या नेत्यांनी फारसे लक्ष दिले नाही. प्रचार किंवा अन्य मदत केली नाही. आपापल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. मुळात ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षांच्या चिन्हावर होत नाही. ही पक्षविरहित निवडणूक असते. उमेदवार एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून मतदान केले जात नाही. तर त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर तसेच त्याच्या समाज, जातीपाहून मतदान केले जाते. एकाच पक्षाचे दोन कार्यकर्तेही एकमेकांविरुद्ध निवडणूक लढत होते. त्यामुळे कोणताही पक्ष ग्रामपंचायतीवर सत्तेचा दावा करीत असली तरी त्यात तथ्य नसल्याचे भाजपचे सोनगीर शहराध्यक्ष साहेबराव बिरारी यांनी सांगितले. या निवडणुकीत आमदार, खासदार, वरिष्ठ नेत्यांचे योगदान काय, ते आधी स्पष्ट करावे मग सत्तेचा दावा करावा असे श्री. बिरारी यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political marathi news songire dhule BJP leaders time think congress winning walk