'बेलगंगा'चा बॉयलर पेटण्यापूर्वीच धगधग सुरू

आनन शिंपी
शुक्रवार, 15 जून 2018

चाळीसगाव : जिल्हा बॅंकेच्या ताब्यात असलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या अंबाजी ग्रुपने विकत घेतल्यापासून अंतर्गत राजकीय युद्ध सुरू झाले आहे. हा कारखाना येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने अंबाजी ग्रुपने यंत्रांच्या दुरुस्ती कामाला एकीकडे गती दिलेली असताना, दुसरीकडे त्यांना अप्रत्यक्षरीत्या विरोधही होत आहे. त्यामुळे "बेलगंगा'चा बॉयलर पेटण्यापूर्वीच धगधग सुरू झाली आहे. अंबाजी ग्रुपला विरोध करणारे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारताना दिसत आहेत. त्यामुळे बेलगंगा कारखान्याचा विषय सध्या तालुक्‍यात चर्चेचा बनला आहे. 

चाळीसगाव : जिल्हा बॅंकेच्या ताब्यात असलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या अंबाजी ग्रुपने विकत घेतल्यापासून अंतर्गत राजकीय युद्ध सुरू झाले आहे. हा कारखाना येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने अंबाजी ग्रुपने यंत्रांच्या दुरुस्ती कामाला एकीकडे गती दिलेली असताना, दुसरीकडे त्यांना अप्रत्यक्षरीत्या विरोधही होत आहे. त्यामुळे "बेलगंगा'चा बॉयलर पेटण्यापूर्वीच धगधग सुरू झाली आहे. अंबाजी ग्रुपला विरोध करणारे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारताना दिसत आहेत. त्यामुळे बेलगंगा कारखान्याचा विषय सध्या तालुक्‍यात चर्चेचा बनला आहे. 

बेलगंगा कारखान्यावर बुधवारी (13 जून) चित्रसेन पाटील यांनी पत्रकार परिषदेत थेट आमदार उन्मेष पाटलांवर आरोप केला. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेची शासनाकडे उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या निवेदनासंदर्भात आमदार पाटील यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्‍न उपस्थित केल्याने हा कारखाना सुरू होऊ नये, असे आमदारांनाच वाटत असल्याचे चित्रसेन पाटील यांनी सांगितले. या विषयावर आमदार पाटील यांनी आपली सविस्तर भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

आतापर्यंत चित्रसेन पाटील यांनी आमदार उन्मेष पाटलांचे नाव घेतले नव्हते. बुधवारच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीररीत्या घेतले व त्यांना असे का करावे लागले, याचे कारणही चित्रसेन पाटील यांनी सांगितले. त्यावर आमदार पाटील आपली भूमिका लवकरच स्पष्ट करतीलही. असे असले तरी तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कामगारांचा विचार करता, कारखाना सुरू व्हावा, याबद्दल कोणाचेही दुमत नसावे.

हा कारखाना आता खासगी कंपनीने विकत घेतला असला, तरी तो सुरू झाल्यानंतर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येथील भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या अंबाजी ग्रुपने कारखाना विकत घेतला नसता, तर कुठल्या ना कुठल्या उद्योजकाने तो घेतलाच असता. कारण, जिल्हा बॅंकेला त्यांचा पैसा वसूल करणे गरजेचे होते. 

कारखान्याच्या नावावर आतापर्यंत कोणी- कोणी आपली राजकीय पोळी भाजून घेतली, हे सबंध तालुक्‍याला ज्ञात आहे. सहकारात राजकारणाचा शिरकाव झाला, की सहकार क्षेत्र लयास पावते, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. बेलगंगा कारखानादेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे आता कारखाना खासगी मालकीचा झाला असला, तरी तो सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या तालुक्‍यातील जनतेलाच होणार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत जो काही विरोध अंबाजी ग्रुपला होत आहे, तो पाहता यात नुकसान कोणाचे होईल, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. 

जनहित याचिका दाखल 
ऑक्‍टोबरपर्यंत कारखाना कुठल्याही परिस्थिती सुरू करण्यासाठी एकीकडे अंबाजी ग्रुप गतीने कामाला लागला आहे. व्यापारी दृष्टिकोनातून कंपनीच्या भागीदारांनी सद्यःस्थितीत मोठा पैसा लावला आहे. एकीकडे हे आशादायक चित्र असताना, दुसरीकडे अंबाजी ग्रुपला अडचणीत आणण्याचेदेखील प्रयत्न होत आहेत. नुकतीच उ. मो. पाटील (उंबरखेड) व नरेश साळुंखे (मेहुणबारे) यांनी जिल्हा बॅंकेने चुकीचा व्यवहार केल्याने रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकेवर कारवाई करावी, यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

ही याचिका दाखल करण्यामागे शेतकरी नात्याने न्याय मिळावा, ही भूमिका कदाचित याचिकाकर्त्यांशी असू शकते. मात्र, चित्रसेन पाटील यांनी यासंदर्भात उ. मो. पाटील व नरेश साळुंखे यांना थेट विचारणा केली असता, त्यांना कुठल्या विषयाची याचिका दाखल केली आहे, हेच माहीत नव्हते, असे चित्रसेन पाटील यांनी सांगितले. एकूणच ही याचिका दाखल करणारेच या विषयाबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांच्यामागे कोण आहे? हेदेखील तालुक्‍यातील जनतेला सांगण्याची गरज नाही, असे चित्रसेन पाटील जे म्हणतात, त्यांच्या म्हणण्यातही तथ्य आहे.

ही सर्व परिस्थिती   पाहता, बेलंगगा कारखान्याचा "बॉयलर' पुन्हा पेटावा, हीच तालुक्‍यातील जनतेची इच्छा असून ती पूर्ण व्हावी, असा आशावाद काहींचा अपवाद वगळता सर्वत्र व्यक्त होत आहे.

Web Title: Political rivalry in Belganga Cooperative Sugar factory