आरम नदीपात्रात दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडल्याने आरोग्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सटाणा - येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा यात्रोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आला असताना सटाणा पालिका प्रशासनाने शहरातील गटारींचे सांडपाणी देवमामलेदारमंदीरामागील आरम नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे यात्रा परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून भाविकांसह नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाचे आवाहन करत शहर स्वच्छतेचे धडे देणाऱ्या सटाणा पालिका प्रशासनाला आरम नदीपात्राच्या स्वच्छतेचे वावडे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सटाणा पालिका प्रशासनाकडून शहराच्या सर्व गटारींमधील सांडपाणी तीन ते चार ठिकाणी आरम नदीपात्रात सोडले जाते. गटारींच्या दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याने व दलदलीने नदीपात्रातजलपर्णी वाढत आहेत. नदीत वाहून येणाऱ्या जलपर्णी, सांडपाणी, कचरा यामुळे आरम नदीची गटारगंगा होत असून नदीचे पावित्र्य भंग पावत आहे. पालिका प्रशासनाने शहरातील काही गटारींचे सांडपाणी एकत्रित करून देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मंदीरामागील आरम नदीपात्रात मोकळ्या जागेत सोडून दिले आहे. नदीपात्रात चारी खोदुन हे सांडपाणी सोडल्याने मोठी दुर्गंधी पसरली आहे. या सांडपाण्याबरोबरच परिसरात प्लास्टिक व दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच कचर्‍याचे मोठे ढीग साचले असून कुत्री व डुकरांचा मुक्त संचार आहे. देवमामलेदार मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टच्या जागेवर भाडेतत्वावर शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह सुरू आहे. वसतीगृहातील शेकडो निवासी विद्यार्थिनींना ही दुर्गंधी असह्य होत असून त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. परिसरातील नागरिकांनाही या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचा गाजावाजा करणार्‍या पालिका प्रशासनाकडून भुयारी गटारींबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. शहरातील अनेक जुन्या गटारी तुडुंब भरल्या असून पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर त्यांचा उपसाही केला जात नाही. त्यामुळे गल्लीबोळात दुर्गंधीचे वातावरण आहे. येत्या आठ दिवसात देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा यात्रोत्सव सुरू होत असून १५ दिवसांच्या यात्रोत्सवात लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. आरम नदीपात्रालगतच अनेक उपहारगृहे थाटली जाणार असून देवमामेलदार मंदिरात सलग पंधरा दिवस महाप्रसादही दिला जाणार आहे. त्यामुळे आरम नदीपात्रातील या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा भाविकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. पालिका प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे.

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मंदीरामागील आरम नदीपात्रात पालिकेने सोडलेले हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी प्रशासनाने स्वतंत्र पाईपने इतरत्र वाहून न्यावे अशी विनंती देवस्थान ट्रस्टने काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने नाईलाजास्तव देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत निवेदन दिले असून याप्रश्नी त्यांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: polution in aaram river