Positive News : आई देवाघरी गेली अन् 'त्यांना’ लागला सहाही पिल्लांचा लळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Sonwane is taking care of six puppies

Positive News : आई देवाघरी गेली अन् 'त्यांना’ लागला सहाही पिल्लांचा लळा!

कापडणे (जि. धुळे) : त्यांचा जन्म झाला अन् अवघ्या दोनच दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी नुकतेच डोळे उघडले. आई दिसत नसल्याने आवाज काढीत...आईला हाक देत होते.

हा आवाज दिलीप सोनवणे तथा दिलीप टेलर यांनी ऐकला. त्यांच्या लक्षात आले की त्यांची आई वारली अन् टेलर यांचे डोळे भरून आले. त्यांनी त्या सहाही पिल्लांचा सांभाळ करण्याचे ठरविले. गेल्या काही दिवसांपासून ते दररोज तीन लिटर दुधाची व्यवस्था करीत आहेत. त्यांनी आवाज दिल्याबरोबर ते आता बाहेर पळत येतात. (Positive thaughts dilip sonavane taking care of six dog puppies lost their mother dhule news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

येथील मराठी शाळेच्या गढीलगत एक कुत्री व्यायली. सहा पिल्लांना जन्म दिला. अवघ्या दोनच दिवसांत तिचे आजारपणाने निधन झाले. ही गोष्ट दिलीप सोनवणे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्या सहाही पिल्लांचा सांभाळ करण्याचे ठरविले. दोनच दिवसांची असल्याने त्यांना दुधाची गरज आहे. ते दररोज तीन लिटर दूध विकत घेत आहेत.

मित्रपरिवार उचलतोय दुधाचा खर्च

दिलीप टेलर यांची परिस्थितीही बेताची आहे. ते दररोजचा एवढा खर्च करू शकत नाहीत. त्यांनी ही बाब मित्रांच्या कानी घातली. दररोज तीन लिटर दुधाचे प्रायोजक मिळताहेत! पिल्लांची भूक वाढली आहे. दुधाचा खर्चही वाढला आहे. येथील दूध विक्रेतेही मोफत दूध देत आहेत.

"मुक्या प्राण्यांवर दया केली पाहिजे हे शाळेत शिकलो आहे. ही पिल्ले हिंडूफिरू लागली. खाऊपिऊ लागली म्हणजे माझे कर्तव्य पूर्ण होईल. अजून दहा-पंधरा दिवस तरी सांभाळ आणि दूध पुरविणे गरजेचे आहे." -दिलीप टेलर, कापडणे