खासगी डॉक्‍टरांनी उपसले संपाचे हत्यार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नाशिक - डॉक्‍टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांनी आजपासून तीनदिवसीय संप सुरू केला. या कालावधीत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी)सह अन्य सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. ठोस तोडगा न निघाल्यास पुढेही आंदोलन असेच सुरू ठेवले जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, सचिव डॉ. प्रशांत देवरे, डॉ. आवेश पलोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक डॉक्‍टर आंदोलनात सहभागी होत असल्याचा दावा या वेळी करण्यात आला. 

डॉ. देवरे म्हणाले, की रुग्णांच्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. परंतु, डॉक्‍टरांच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याने अशा प्रकारे पाऊल उचलावे लागत आहे. दडपणाखाली काम करणे अशक्‍य झाले असल्याने डॉक्‍टरांविषयी सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. डॉक्‍टरांवरील वाढत्या हल्ल्यांची गांभीर्याने दखल घेत शासनाने कठोर कायदा करावा, तसेच या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी डॉ. निवेदिता पवार, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. सतीश पाटील, डॉ. राजश्री पाटील आदी उपस्थित होते. 

...तर मनपा, सरकारी रुग्णालयात घ्यावा उपचार 
आंदोलन काळात रुग्णांनी महापालिका, तसेच शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावा, असे आवाहन "आयएमए'तर्फे करण्यात आले आहे. मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जात असून, आंदोलन काळात डॉक्‍टर आयएमए सभागृहात बसून राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

एसएमबीटी, अपोलोसह मोठ्या रुग्णालयांचाही सहभाग 
"आयएमए'च्या आंदोलनाला पाठिंबा देत रुग्णालयातील सर्व सेवा आंदोलन काळात बंद ठेवणार असल्याचे एसएमबीटी रुग्णालयाचे संचालक डॉ. हर्षल तांबे यांनी जाहीर केले. अपोलो रुग्णालय बंद राहणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. वोक्‍हार्ट व अन्य मोठे रुग्णालय या कालावधीत बंद राहणार आहे. 

डॉक्‍टरांवरील हल्ले केवळ बिलाच्या कारणामुळे होतात, हा गैरसमज आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टरांवरील हल्ल्याचे प्रमाण अधिक आहे. हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. 
- डॉ. निवेदिता पवार, अध्यक्ष, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना. 

डॉक्‍टरांचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर करीत शासनाकडून दिशाभूल केली जात आहे. न्यायालयाने केलेली टिप्पणीही दुर्दैवी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वैद्यकीय शिक्षणाकडे कुठलाच तरुण वळणार नाही. 
- डॉ. राजेंद्र कुलकर्णी 

आंदोलन काळात सर्व डॉक्‍टर "आयएमए'मध्ये उपस्थित राहणार आहेत. आवश्‍यकता भासल्यास आंदोलन असेच पुढे सुरू ठेवले जाईल. 
- डॉ. आवेश पलोड 

Web Title: Private doctors took strike weapon