काळ्या पैशाने धरली रेल्वेची वाट!

शिरीष सरोदे
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

भुसावळ विभागात एकाच दिवसात सव्वा कोटीचे तिकीट बुकिंग 
भुसावळ - पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे काळ्या ठरू पाहणाऱ्या पाचशे-हजाराच्या नोटांनी चक्क रेल्वेची वाट धरल्याचे दिसून आले आहे. कारण, कधी नव्हे ते भुसावळ रेल्वेला तिकीट आरक्षणातून बुधवारी (ता. ९) एकाच दिवसात तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये प्राप्त झाले आहेत. एका दिवसात केवळ आरक्षणातून इतकी मोठी रक्कम प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत क्रांतिकारी निर्णयानंतर व्यवहारातून पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द झाल्याची बातमी पसरताच ९ नोव्हेंबरच्या सकाळपासूनच ग्राहकांसह नागरिकांनी रेल्वे आरक्षण तिकीट खिडकी गाठली आणि वातानुकूलित श्रेणीतील लांब पल्ल्याच्या तिकिटांच्या आरक्षणातून हजारो रुपये गुंतवले. काहींनी चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत पाचशे आणि हजारांच्या नोटांच्या स्वरूपात पैसे गुंतवल्याचे व एजंटांचा यात मोठा हात असल्याचे सांगण्यात आले. नंतर तिकीट रद्द करून किरकोळ पैसे वजा जाता आपल्याला मोठी रक्कम नवीन चलन अथवा शंभराच्या नोटांच्या रूपात परत मिळेल, असा हेतू होता. मात्र रेल्वे प्रशासनाने दहा हजार रुपयांपेक्षा जास्त दराच्या तिकीट रद्दची रक्कम तातडीने परत करण्याऐवजी व्हॉऊचर दिले आहे. त्यामुळे पैसे मोकळे करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

भुसावळ रेल्वे विभागातील नाशिक, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अकोला, शेगाव, बऱ्हाणपूर अशा ए वन आणि ए श्रेणीच्या स्थानकातून ९ नोव्हेंबरच्या दिवसभरात एक कोटी २८ लाख रुपयांचे तिकीट आरक्षण झाल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

आज (ता. १०) सकाळपासून तिकीट आरक्षणासाठी गर्दी होती, मात्र कालच्या मानाने ती कमी झाली. त्यामुळे आज दिवसभर झालेल्या रेल्वे तिकीट विक्रीचा हिशोब मिळू शकला नाही, उद्या (ता. ११) सकाळनंतर याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. दरम्यान, शहरात बॅंका उघडल्याने लोकांनी पैसे भरण्यासाठी धाव घेतली. तसेच पंजाब नॅशनल बॅंकेसह इतर राष्ट्रीयकृत बॅंकांमधून दोन हजारांची नवीन चलनी नोट ग्राहकांना देण्यात आली. दुसरीकडे सोन्याचे भाव उतरले असून, आज ३१ हजार ५०० रुपये तोळे भावाने किरकोळ व्यवहार झाल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली.

रेल्वेकडूनही हिरमोड
दहा हजारांपेक्षा जास्त किमतीचे रेल्वे तिकीट रद्द करणाऱ्याला रेल्वेकडून पैसे परत न देता व्हॉऊचर देण्यात आले आहे. त्यामुळे पाचशे, हजारांच्या नोटा आरक्षणाच्या माध्यमातून खपवल्यानंतर लगेच ते तिकीट रद्द करून नवीन चलन अथवा शंभराच्या नोटा मिळवण्याची शक्कल काढलेल्या महाभाग ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.

Web Title: Railways treated for black money!