अवकाळीचे संकट; धुळे, नंदुरबार जिल्‍ह्यांत गारांसह पाऊस 

अवकाळीचे संकट; धुळे, नंदुरबार जिल्‍ह्यांत गारांसह पाऊस 

म्हसदी : धुळे, नंदुरबार जिल्‍ह्यांतील काही भागात गुरुवारी सायंकाळी अचानक गारवा निर्माण होऊन गारांसह पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. 

सोळागाव, काटवान परिसरात सायंकाळी अचानक गारांसह पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. काटवान परिसरातील म्हसदी, धमनार, ककाणी, भडगाव, राजबाईशेवाळी, बेहेड, काळगाव, चिंचखेडे, विटाई, निळगव्हाण, छाईल, प्रतापपूर, दिघावे, उंभरे, उंभरटी आदी भागात वादळी पाऊस झाला. तयार झालेले गहू, हरभरासारखे पीक पाण्यात सापडले आहे. बेहेड शिवारात डाळिंब, द्राक्षासारख्या फळपिकांना फटका बसला आहे. सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्याने काढणीवर आलेल्या पिकांना अधिक धोका वाढला आहे. 

पिंपळनेरसह परिसरात पाऊस 
पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात जेबापूर, चिकसे, देशशिरवाडे येथे तुरळक पावसासह साक्री तालुक्यातील बल्हाणे, कुडाशी येथे जोरदार गारांचा पाऊस होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे गहू, कांदा, मसूर, वाटाणा, हरभरे, भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळे धुके निर्माण होऊन टॉमॅटो व भाजीपाला यासारख्या पिकांवर रोग पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सायंकाळी पिंपळनेर शहरासह परिसरात उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करून सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे. 


तोरणमाळला गारपीट 
शहादा : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ (ता. धडगाव) येथे गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसासह गारपीट झाली. जवळपास तीस मिनिटे गारपिटीसह पाऊस झाल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली त्यातच परिसरात शेतकऱ्यांचे काही प्रमाणात गहू पिकाचे नुकसान झाले. 

शिरपूरला कडकडाट 
शिरपूर शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. नागरिकांची एकच धावपळ झाली. शहरात सुमारे दहा मिनिटे सरी बरसल्या. विजा मात्र उशिरापर्यंत चमकत होत्या. कापणीवर आलेल्या ज्वारीला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

दोंडाईचात अर्धा तास पाऊस 
दोंडाईचा व परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास मेघगर्जनेसह अचानक वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने मिरची, गहू, कांदा, हरभरासारख्या रब्बी पिकांचे नुकसान झाले. तसेच मिरचीच्या खरेदीदार व्यापाऱ्याची पथारीवर वाळवण्यासाठी टाकलेल्या मिरचीला गोळा करून झाकण्यासाठी व्यापाऱ्यांची धांदल उडाली होती. 

म्हसदीसह परिसरात पाऊस 
म्‍हसदीसह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन ते अडीच तास झालेल्या पावसामुळे शेतीसह शेतातील घरांची पत्रे, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. येथील ग्रामपंचायतीचे सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी नरेंद्र देवरे यांच्या दोमधर शिवारातील घरावरील छताचे पत्रे उडाले. वादळ असल्यामुळे आंब्याचे सहा झाडे उन्मळून पडली आहेत. 

कोंडाईबारी घाटात गारपीट 
नवापुर तालुक्यात गुरुवारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोनखांब, जामनपाडा पानबारा, चौकी, मोरकरंजा व कोंडाईबारी घाटात गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे, गारपिटीने शेतातील कांदा, भुईमूग, मूग, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने आंब्याचे मोहराला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

बोरीस, बेहेड परिसरात नुकसान 
बोरीस परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गहू, हरभरा, टरबूज, खरबूज, पपई, बोर, पेरू पिकांचे नुकसान झाले आहे. बेहेड (ता. साक्री) येथील प्रभाकर तोरवणे यांच्या शेतातील मका पीक अवकाळी वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनाम्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com