राज्यराणी एक्‍स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याचा घाट

Railway
Railway

इगतपुरी - राज्यराणी एक्‍स्प्रेस आता नांदेडपर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे. या गोष्टीला नाशिककरांनी तीव्र विरोध सुरू केला असून, याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी मध्य रेल्वेला पत्र देऊन ही एक्‍स्प्रेस नांदेडपर्यंत नेऊ नये, अशी मागणी केली आहे. राज्यराणी तोट्यात असल्याचे कारण देत मध्य रेल्वेने मनमाडऐवजी ती नांदेडपर्यंत नेण्याचे नियोजन केले आहे. 

नांदेडहून मुंबईला परत येताना ही गाडी तपोवनप्रमाणे पूर्ण भरून जाईल आणि नाशिककरांनाच जागा राहणार नाही. त्यामुळे हक्काची गाडी इकडे-तिकडे पळवू नये, अशी मागणी होत आहे. 

दरम्यान, मुंबईहून सुटणारी राज्यराणी मनमाडपर्यंत जाते. तिला तोटा होण्यास रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. मनमाडपर्यंत जाताना गाडीला लासलगाव, निफाड येथे थांबा नाही. त्यामुळे प्रवासी गाडीतून जात नाहीत. मनमाडहून मुंबईला जाताना पंचवटीप्रमाणे राज्यराणी दादरला थांबत नाही. त्यामुळेही नाशिकचे प्रवासी तिच्याकडे पाठ फिरवतात. तसेच ‘राज्यराणी’ची मुंबईहून सुटण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईहून नाशिकला येण्यासाठी नंदीग्राम एक्‍स्प्रेस दुपारी साडेचारला आहे. नंतर सायंकाळी सव्वासहाला पंचवटी एक्‍स्प्रेस नाशिककडे प्रयाण करते. नंतर पावणेसातला राज्यराणी आणि पंधरा मिनिटांनी विदर्भ एक्‍स्प्रेस आहे. लवकर पोचण्यासाठी नाशिककर पंचवटीला गर्दी करतात. राज्यराणी पंचवटीच्या आधी सोडली, तर रेल्वे आणि प्रवाशांना फायदा होईल. तसेच, ‘नंदीग्राम’वर व ‘पंचवटी’वर लोड येणार नाही, असे बोलले जात आहे. 

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार नांदेडच्या राजकीय दबावापोटी राज्यराणी पळवली जाणार आहे. या आधी ‘तपोवन’ पळवली. ती नांदेडपर्यंत नेली. नाशिक-भुसावळ ही मनमाड-पुणे होती. ती भुसावळ-पुणे करून नाशिककरांवर अन्याय करण्यात आला. मनमाड-मुंबई गोदावरी एक्‍स्प्रेसही पळविण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला नाशिकचे प्रवासी, उद्योजक, व्यावसायिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर प्रस्ताव मागे घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com