नराधमाच्या फाशीसाठी संघटनांचा मूक मोर्चा

Rally-By-Gor-Sena
Rally-By-Gor-Sena

जळगाव - घरात घुसून पाचवर्षीय बालिकेला आई-वडिलांच्या कुशीतून उचलून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, तसेच हा खटला चालवण्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्यांसह गोर सेना तसेच राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनांसह समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. 

वाघनगर परिसरात हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बांधकाम कामगार कुटुंबीयांच्या घरात घुसून आई-वडिलांसह घरात झोपलेल्या पाचवर्षीय बालिकेला उचलून नेत झोपडीच्या बाहेर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या चारच तासांत संशयिताला अटक करण्यात येऊन गुन्हा उघडकीस आणला. घडलेल्या प्रकाराने शहरासह समाज मन पुन्हा सुन्न होऊन या घटनेचा सर्वत्र धिक्कार करण्यात आला. अटकेतील संशयित राणासिंग जुन्नी (सिकलगर) हा कोठडीत असून, आज गोर सेना, राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेतर्फे शिवाजीपुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर येथे जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. मोर्चात सहभागी संघटनांसह सामान्य जळगावकर समाज बांधवांतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने या गुन्ह्याचा अचूक तपास करून वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात यावे, खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, खटल्याचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येऊन संशयित आरोपीस फाशीची शिक्षा करण्यात यावी, पीडित बालिकेच्या कुटुंबास घरकुल देऊन आर्थिक मदत शासनातर्फे करण्यात यावी, अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. बंजारा समाजातील मुलींनी विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना दिले.

पोलिस, युवकांमध्ये वाद
मूक मोर्चा येत असताना वाहनेही त्याच रस्त्याने येत होते. त्या वाहनांना मोर्चातील काही युवकांनी अडविले. यामुळे पोलिस व युवकांमध्ये काही मिनीट वाद झाला. नंतर वाद मिटविण्यात येऊन मोर्चा पुढे नेण्यात आला.

बंजारासेनेतर्फे निवेदन
अखिल भारतीय बंजारा सेनेतर्फे मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. याप्रकाराची सी.आय.डी.तर्फे चौकशी करण्यात यावी, जलद गती न्यायालयात खटला चालवावा आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल नाईक, उपाध्यक्ष चरणदास पवार, जिल्हाध्यक्ष लालचंद चव्हाण, समाजसेविका जिजाताई राठोड, आत्माराम जाधव आदी उपस्थित होते.

विविध संघटनांसह समाजबांधव सहभागी
गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. सागर राठोड, जिल्हा संघटक चेतन जाधव तसेच बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, महासचिव वाल्मीक पवार, सरचिटणीस अनिल पवार, मुरली चव्हाण, राजू नाईक, जगदीश राठोड, अनिल नाईक, दयाराम तंवर, सीताराम पवार, ॲड. अविनाश जाधव, ॲड. श्‍याम जाधव, अरुण राठोड यांच्यासह समतानगर, अयोध्यानगर, रामेश्वर कॉलनी, सुप्रिम कॉलनी, खोटेनगर, विनोबा भावे नगर यांच्यासह समाजबांधवांनी या घटनेचा निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com