धनगर आरक्षणप्रश्नी निजामपूर-जैताणेत रस्ता रोको आंदोलन!

भगवान जगदाळे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. दरम्यान आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सार्वजनिक अभिवादनही करण्यात आले.

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील धनगर समाजातर्फे आरक्षणाबाबत आज (ता.13) सकाळी नऊच्या सुमारास बसस्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज सोमवारचा आठवडे बाजार असल्याने साक्री-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. दरम्यान आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सार्वजनिक अभिवादनही करण्यात आले.

केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 'धनगर' समाजाचा उल्लेख 'धनगड' असा असल्याने समाजाला तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जमातीत समाविष्ट व्हायला अडचणी येत आहेत. सद्या केंद्राच्या सूचित धनगर समाज 'ओबीसी' प्रवर्गात असून राज्याच्या सूचित धनगर समाज हा 'एनटी' प्रवर्गात आहे. त्यामुळे शासनाने ताबडतोब धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आश्वासनपूर्ती करावी. अशी मागणी यावेळी धनगर समाजबांधवांतर्फे करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अशोक मुजगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते युसूफ सय्यद यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी धनगर समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. पिवळे झेंडे हातात घेऊन 'यडकोट यडकोट जय मल्हार'च्या जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या. निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सहकाऱ्यांसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवला.

उद्या 'गाव बंद'चे आवाहन..
उद्या, मंगळवारी निजामपूर-जैताणेत दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता धनगर समाजबांधवांनी दोन्ही गावात 'बंद'चे आवाहन केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाचेही घडामोडींवर बारीक लक्ष आहे.!

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Rasta Roko At Nijampur Jaitane For Dhangar Reservation