रावेर: सततच्या पावसामुळे केळी कापणीचे वाढलेले प्रमाण आणि मागणीत झालेली काहीशी घट यामुळे महिनाभरापासून केळीचे भाव घसरणीला लागले आहेत. अवघ्या दीड महिन्यात केळीचे भाव तीन हजार रुपये क्विंटलवरून अवघे ५०० ते ५५० रुपये क्विंटलपर्यंत घसरले आहेत. गेल्या सहा वर्षांतील केळी भावाची ही सर्वांत नीचांकी पातळी आहे. या घसरलेल्या भावाबद्दल शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तर व्यापाऱ्यांनी बाजारपेठेच्या स्थितीला दोष दिला आहे.