खडसेंच्या भूमिकेवर अडले 'रावेर'चे घोडे !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशात जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे घोडे मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर अडल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच आघाडीतर्फे कोण लढणार याचा निर्णय लागणार असल्याचे वृत्त आहे.

जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशात जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे घोडे मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या निर्णयावर अडल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच आघाडीतर्फे कोण लढणार याचा निर्णय लागणार असल्याचे वृत्त आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. आघाडीच्या जागा वाटपानुसार जिल्ह्यातील रावेर व जळगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. दोन पंचवार्षिक ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली आहे. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. आपल्याकडे निवडून येण्याच्या क्षमतेचा उमेदवार असून, या मतदार संघात पक्षाची स्थिती चांगली असल्याचेही काँग्रेसच्या नेतृत्वाने दोन्ही पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. या शिवाय रावेर मतदारसंघ काँग्रेसला दिल्यास जळगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारालाही त्याचा फायदा होईल. दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कार्य करतील, असा विश्‍वास व्यक्त करून ‘राष्ट्रवादी’नेही जागा काँग्रेसला सोडावी असे सांगण्यात आले. 

खडसेंसाठी राष्ट्रवादीची प्रतीक्षा
राष्ट्रवादीने मात्र रावेरसाठी आपला दावा कायम ठेवला असल्याचे सांगितले आहे. मात्र, पक्षाच्या नेतृत्वाने दूरदृष्टीचा विचार करून भाजपत नाराज असलेले माजी मंत्री खडसे हे ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करतील. त्यानंतर ते सांगतील त्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांचे मतदारसंघातील कार्य पाहता त्यांना पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, मध्यंतरी पक्षाच्या खासदारांच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे दाखले देत त्यांचा परफॉर्मन्स कमी असल्याचे सांगून श्रीमती खडसेंना उमेदवारी मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे जर रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली नाही, तर अगोदरच पक्षाने मंत्रिपद काढून अन्याय केल्यामुळे नाराज असलेले खडसे भाजप सोडतील, असा दोन्ही काँग्रेस नेत्यांचा होरा आहे. ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा विश्‍वास पक्षनेतृत्वाला वाटत आहे. पक्षाच्या नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीतही ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पक्षाने ही जागा आपल्याकडे ठेवली असून, त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांच्या सांगण्यानुसार या मतदार संघात उमेदवार निश्‍चित केला जाणार आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारही खडसेंच्या भूमिकेवर टांगणीला लागले आहेत.  

...तर काँग्रेसला जागा
जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही जागा असल्याने त्याचा निर्णय याच पक्षाकडे असल्याने काँग्रेसकडे उमेदवार असूनही ते दावा करण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. मात्र ‘राष्ट्रवादी’ने यात आणखी एक पर्याय ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे. जर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही, तर मात्र ही जागा काँग्रेसला सोडली जाईल असेही सांगितले जाते. अर्थात, खडसेंनीही भाजप सोडणार नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता रावेर लोकसभा मतदार संघाचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागेच्या निर्णयासह उमेदवार निश्‍चितीही भाजपच्या जागा वाटपानंतरच निश्‍चित होईल, हे स्पष्ट आहे. खासदार रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली, तर प्रश्‍नच मिटणार आहे. परंतु, नाही उमेदवारी दिली तर एकनाथराव खडसे काय निर्णय घेतात, यावरच ‘आघाडी’ची उमेदवारी निश्‍चित होईल. सध्या तरी खडसेंच्या प्रतीक्षेत ‘आघाडी’चे रावेर लोकसभा मतदारसंघाचे ‘घोडे’ अडले आहे.

Web Title: Raver Lok Sabha Constituency eknath khadse