
Nandurbar Fraud Crime : साखरपुड्यानंतर मुलीशी लग्न करण्यास नकार; 'वरा'वर फसवणुकीचा गुन्हा
Nandurbar Fraud Crime : पिंप्रिपाडा (ता. नंदुरबार ) येथील मुलीशी लग्न जमवून साखरपुडाही उरकला, मात्र महिना होत नाही तोच नियोजित वरासह त्याचा कुटुंबीयांकडून लग्न करण्यास नकार दिल्याने खांदेपाडा (नवागाव) येथील तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Refusal to marry girl after engagement case of fraud against groom nandurbar fraud news)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्रिपाडा (ता. नंदुरबार) येथील एका मुलीशी खांदेपाडा (नवागाव, ता. नंदुरबार) येथील गणेश वखू गावित या युवकाचे लग्नाबाबत बोलणी झाली. त्याच्या कुटुंबीयांकडून मुलगी पाहण्याचा कार्यक्रमासह रिवाजाप्रमाणे सोपस्कार पार पडले.
तसेच, १८ मे २०२३ ला मुलीशी गणेश गावित या तरुणाचा साखरपुडा पार पडला. त्यासाठी मुलीच्या वडिलांनी नातेवाइकांचा उपस्थितीत हा कार्यक्रम केला. त्यानंतर लग्नाची तारीखही निश्चित झाली. सहा जून २०२३ ला हळदीचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी लग्न निश्चित केले. एका महिनाभरात वधू पित्याने लग्नाची तयारी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र हळदीच्या काही तासांपूर्वीच मुलगी पसंत नसल्याचे कारण दाखवून ऐनवेळेस मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे वधू पित्यासह कुटुंबीयांची फजिती झाली. लग्नासाठीचा खर्च करून तयारी झाल्यावर ऐनवेळेस नकार दिल्याने वधू पित्याची व वधूची फसवणूक केली.
त्यामुळे नियोजित वधूने स्वतः नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गाठत घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यावरून खांदेपाडा येथील नियोजित वर असलेला गणेश वखू गावित, त्याचे वडील वखू नाथल्या गावित व आई मागीबाई वखू गावित या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.