प्राचीन काळापासून प्रख्यात असलेल्या भवानी मातेच्या यात्रोत्सोवाला सुरवात

दीपक खैरनार
शुक्रवार, 30 मार्च 2018

तब्बल दोन वेळा महापुराचा फटका मंदिराला बसलायं मात्र मातेची दगडी पाषाणातील कोरीव मुर्ती आजही 'जैसे थे' आहे. विशेष म्हणजे गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून दोन वेळा मंदीर बांधून या मंदिराचा जिर्णोधार केला आहे.

अंबासन (जि. नाशिक) - आदिशक्ति, आदिमाया, भगवती, जगदंबा, कालीमाता, सप्तशृंगी, रेणुका अशी अनेक नावारूपाने भवानी मातेला संबोधले जाते. याच भवानी मातेचे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे मंदीर मोसमतीरावर आहे. तब्बल दोन वेळा महापुराचा फटका मंदिराला बसला आहे. मात्र मातेची दगडी पाषाणातील कोरीव मुर्ती आजही 'जैसे थे' आहे. विशेष म्हणजे गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून दोन वेळा मंदीर बांधून या मंदिराचा जिर्णोधार केला आहे. प्राचीन काळापासून प्रख्यात असलेल्या भवानी मातेची चैत्र पौर्णिमेला उद्या शनिवार (ता. 31) पासून यात्रोत्सोवाला सुरवात होत आहे. 

मोराणे सांडस (ता. बागलाण) येथील मोसमतीरावर भव्य दिव्य भवानी मातेचे मंदिर आहे. तालुक्यापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेल्या या गावात ग्रामदैवत भवानी मातेची चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. हे प्राचीन मंदिर दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे असल्याचे जाणकार सांगतात. 1944 मध्ये मोसम नदीला महापूर आला आणि सर्वत्र होत्याचे नव्हते झाले होते. अनेकांचे पाळीव जानावरे पुरपाण्यात वाहून गेली होती. याच वेळी मातेचे मंदिरही वाहून गेले. मात्र त्या जागेवरून साडेतीन बाय अडीचची दगडी पाषाणातील कोरीव मुर्ती जशीच्या तशीच उभी लोकांनी पाहिली होती. त्यानंतर स्थानिक लोकांनी लोकवर्गणीतून त्याच ठिकाणी मंदीर बांधण्यास सुरवात केली. तेव्हापासून देवीच्या नावाने लांगड, तगतराव सुरू झाले. या देवीसंदर्भात अनेक आख्यायिका नागरिक आवर्जून सांगतात. मंदिराच्या मुख्य वास्तूची बांधणी पुरातन काळातील काळ्या दगडात केलेली होती. हेमाडपंथी वास्तुशिल्प पध्दतीने या मंदिराची बांधणी एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या दगडांनी केलेली असल्याचे बोलले जाते. आजही गावातील काही लोकांकडे जुन्या आठवणी म्हणून मंदिराचे फोटो घरात लावलेले दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजातील रामा महीपत यांचे वंशज मंदिरात पुजारी आहेत. आज त्यांची पाचवी पिढी त्यांचे नातू शामराव पिंपळसे सेवा करीत आहेत. नवसाला पावणारी देवी भवानी मातेची सर्वत्र प्रख्यात आहे. बाहेरगावहून अनेक भाविक आपली मनोकामना पुर्ण झाल्यावर नवसपुर्तीसाठी येत असतात. 9 सप्टेंबर 1969 रोजी पुन्हा मोसमनदीला महापुराचा फटका बसला त्यावेळीही संपूर्ण मंदीराची पडझड झाली आणि वाहून गेले. भवानी मातेचे अस्तित्व मात्र तसेच होते. काही दिवसांनंतर गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुन्हा मंदिराची उभारणी केली आणि मंदिराचा जिर्णोधार केला. तेव्हापासून म्हणजेच 1987 पासून रामनवमी, हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव साजरा केला जातो.

सात दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह देवीची यात्रा भरविली जाते. आजच्या दिवशी यात्रोत्सोवाला 31 वर्षे पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे आजही तारीख 31 असल्याने हा सर्वात मोठा योग जुळून आल्याची चर्चा गावात रंगली आहे. यात्रोत्सोवाला प्रत्येक घरोघरी गुढी उभारली जाते. तसेच पुरणाची पोळीचा नैवेद्य तयार केले जातात. मंदिरावर रंगरंगोटी, विद्यृत रोशनाई केली जाते. भवानी मातेची गावातून पालखी काढली जाते. सायंकाळी शिवशाहीर किर्तणकार ह. भ. प. गोपाल महाराज चिमठाणेकर यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेण्यासाठी मोराणे सांडस येथील ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.

मोराणे सांडस या गावात गेली अनेक वर्षांपासून दारूबंदी, कु-हाडबंदी करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण गाव परिसर हिरवाईने नटलेला दिसून येतोय. शिवाय या गावाला 2011-12 या वर्षांत शासनाच्या तंटामुक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गावात सर्व जाती एकोप्याने राहत असल्याने सन उत्सव आनंदाने साजरा करतात.  

आमच्या गावात कृष्णा माऊलींच्या आशिर्वादाने फिरत्या नारळाचा कार्यक्रम झाला तसेच संत जनार्दन स्वामी, शेषराव महाराजांचे व्यसन मुक्ती मेळावा, जंगलीदास महाराज, समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांचे किर्तन झाले. अशा संतांनी या छोट्याशा गावात कार्यक्रम केलेत. यात तरूण पिढीने पुढे येणे गरजेचे आहे, असे मोराणे सांडसचे सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी सांगितले आहे.

 

Web Title: Religious program in Ambasan nasik