उत्तर महाराष्ट्रात स्वतंत्र जैवविविधता संस्था उभारण्याचा ठराव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 February 2020

महाराष्ट्र क्षेत्रात पक्षी संवर्धन याबरोबरच वन्यजीव जैव विविधता यांचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी सर्वंकष विचार करणारी संघटना स्थापन करण्याचा निर्णय जळगाव येथील पक्षीमित्र संमेलनात घेण्यात आला.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र क्षेत्रात वन्यजीव आणि आणि निसर्ग संवर्धनाचे कार्यकर्ते मेहनतीने व्यापक कार्य करीत आहेत. परंतु, त्यांच्या कार्याला संशोधनाची जोड नसल्यामुळे त्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात नाही, अशी खंत उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष अनिल माळी यांनी व्यक्त केली. ते उत्तर महाराष्ट्र विभाग पक्षीमित्र संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जैवविविधतेच्या विविध घटकांवर आधारित प्रबंध, निबंध, लघुशोध प्रबंध, लिहून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये मासिकांमध्ये, पाक्षिकांमध्ये मध्ये प्रकाशित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. संमेलनात आज संशोधन विशाल मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ करण्याचा निर्णय करण्यात आला असून, सुधाकर कुऱ्हाडे (अहमदनगर) यांच्याकडे संशोधन व्यासपीठाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे लहान -मोठ्या शोधकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र संघटनेतर्फे निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र क्षेत्रात पक्षी संवर्धन याबरोबरच वन्यजीव जैव विविधता यांचे संवर्धन आणि संशोधन करण्यासाठी सर्वंकष विचार करणारी संघटना स्थापन करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला, या अनुषंगाने अस्थायी समितीची घोषणाही करण्यात आली आहे. संमेलनातील सर्वांत महत्त्वाचा ठराव हतनूर धरणाला रामसरचा दर्जा विषयी मांडण्यात आला, सदर ठराव चातक नेचर कंजर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी मांडला आणि या विषयीचे अभ्यासपूर्ण सादरीकरण त्यांनी केले.

 

जागतिक पाणथळ दिन साजरा

विभागीय पक्षीमित्र संमेलनात आज सकाळी गांधी तीर्थवरील जलाशयावर जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुधाकर कुऱ्हाडे आणि अनिल माळी यांनी मार्गदर्शन केले. या परिसरात निसर्ग भ्रमण आणि पक्षी निरीक्षणही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर लोकप्रभाचे संपादक सुहास जोशी (मुंबई) यांनी सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी देशातील पाणथळ क्षेत्र संकटात असल्याचे सांगत त्यांनी याविषयी अनेक आंतरराष्ट्रीय दाखले देऊन मुंबई आणि महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असल्या बद्दल चिंता व्यक्त केली. वेटलॅंड इंटरनॅशनल साउथ एशियाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे भारतात सर्वाधिक वेटलॅंडचा नाश होत असून, पानथळीचे संवर्धन हा शासन-प्रशासन, समाज अशा सर्वांचाच अनास्थेचा विषय आहे. पाणथळीच्या सर्वेक्षणा विषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये 735 पाणथळ क्षेत्रे आहेत आणि त्यातील 31 क्षेत्रे आरक्षित करण्यात आली आहे, परंतु तरीही एका जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याने असे विधान करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे श्री. जोशी यांनी सांगितले.

पुढचे संमेलन नंदुरबारला

याव्यतिरिक्त संमेलनात इम्रान तडवी, डॉ. भागवत (धुळे), उदय चौधरी (तांदळवाडी), राहुल सोनवणे, यांनी विषयांचे सादरीकरण केले. आगामी संमेलन नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला, या संमेलनाचे संयोजन समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेच्या वतीने करण्यात आले होते. आणि संयोजन सहभाग म्हणून वन्यजीव संरक्षण संस्था, न्यू कॉन्झर्वर, चातक नेचर कॉन्झर्वेशन संस्था, उपज, गरुडझेप, अग्निपंख, आणि उडान , ऑर्किड नेचर फाउंडेशन या संस्थांनी सक्रिय भूमिका पार पाडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resolution to set up an independent biodiversity institution for northern Maharashtra